न्यूझीलंडने आमच्यावर तिन्ही आघाडय़ांवर मात केली. त्यांच्यासारख्या दर्जेदार आणि सर्वोत्तम संघाविरुद्धचा पराभव आम्हाला बोध देणारा आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा कर्णधार विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिका पराभवानंतर व्यक्त केली.

कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताला प्रथमच कसोटी मालिकेत निर्भेळ पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र कोहलीने सहकाऱ्यांना या पराभवातून बोध घेण्याचे सुचवत चुकांची पुनरावृत्ती टाळण्याचे सांगितले.

‘‘संपूर्ण मालिकेत आम्ही निराशाजनक खेळ केला. विशेषत: न्यूझीलंडने आम्हावर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. संघ म्हणून आम्ही कामगिरी उंचावण्यात अपयशी ठरलो. न्यूझीलंड हा एक सर्वोत्तम संघ म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या पराभवाची खंत वाटून घेणे अयोग्य ठरेल,’’ असे कोहली म्हणाला.

‘‘परंतु यामधून बोध घेणे नक्कीच गरजेचे आहे. कारण जर आम्ही फक्त पराभवाविषयी चर्चा करून पुढील मालिकेत त्याच चुकांची पुनरावृत्ती करणार असलो, तर सर्व निष्फळ आहे. न्यूझीलंडने ट्वेन्टी-२० मालिका गमावल्यानंतर ज्याप्रकारे एकदिवसीय आणि कसोटी मालिकेत झोकात पुनरागमन केले, ते पाहून भारताच्या खेळाडूंनीही शिकण्यासारखे आहे,’’ असेही कोहलीने सांगितले.

कोहलीने मालिकेतील सकारात्मक बाबींवरही लक्ष केंद्रित करण्याचे सुचवले. ‘‘जसप्रीत बुमराने दुसऱ्या कसोटीद्वारे सूर गवसल्याचे संकेत दिले. त्याशिवाय रवींद्र जडेजानेसुद्धा अष्टपैलूत्व सिद्ध केले. वैयक्तिक कामगिरीविषयी मी समाधानी नाही. परंतु यातून मी लवकरच स्वत:ला सावरेन,’’ असे कोहली म्हणाला. कोहलीला या मालिकेत एकही अर्धशतक झळकावता आले नाही.

सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान कोहलीचा रुद्रावतारही बघायला मिळाला. मैदानावरील वर्तनामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या कोहलीला पत्रकाराने तुला असे वर्तन शोभते का, असा प्रश्न केला. त्यावर कोहली म्हणाला, ‘‘सामनाधिकारी आणि पंच यांना मी कसे वर्तन केले अथवा कोणाला उद्देशून काय शब्द उच्चारले, हे ठाऊक आहे. त्यामुळे तुम्ही येथे हा प्रश्न विचारून वादग्रस्त बातमी मिळवण्याचा प्रयत्न करू नका. या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी ही योग्य जागाही नाही.’’