श्रीलंकेविरुद्ध आजपासून दुसरा कसोटी सामना; लोकेश राहुलचे संघात पुनरागमन

पहिल्या सामन्यात वर्चस्व गाजवल्यावर दोन वर्षांनी पुन्हा एकदा श्रीलंकेच्या धर्तीवर मालिका विजयाचा निर्धार भारतीय संघाने केला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून सुरुवात होणार असून हा सामना जिंकत भारताला मालिका खिशात टाकण्याची नामी संधी असेल. दुसरीकडे हा सामना जिंकला तर श्रीलंकेला मालिकेत आपले आव्हान कायम राखता येईल. भारतीय संघासाठी महत्त्वाची बाब म्हणजे सलामीवीर लोकेश राहुलचे पुनरागमन. तापाने आजारी असलेला राहुल आता पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून तो दुसऱ्या सामन्यात खेळणार असल्याच्या वृत्ताला कर्णधार विराट कोहलीने दुजोरा दिला आहे.

पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात सलामीवीर शिखर धवनने १९० धावांची धडाकेबाज खेळी साकारली होती, तर चेतेश्वर पुजारानेही दीडशतक झळकावले होते. दुसऱ्या डावात कोहलीनेही शतक झळकावले होते. त्यामुळे या तिघांकडून कामगिरीत सातत्य राखण्याची संघाला अपेक्षा असेल. पण अजिंक्य रहाणेला अजूनही लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. गेल्यावेळी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत रहाणेने सर्वाधिक झेल पकडण्याचा विक्रम रचला होता. त्यामुळे यावेळी मालिकेत तो कशी कामगिरी करतो, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल. अष्टपैलू हार्दिक पंडय़ाही उपयुक्त कामगिरी करत आहे. अभिनव मुकुंदने गेल्या सामन्यात ८१ धावांची खेळी साकारली असली तर राहुलच्या समावेशामुळे त्याला संघाबाहेर राहावे लागणार आहे. गोलंदाजीमध्ये रवींद्र जडेजाने दोन्ही डावांत प्रत्येकी तीन बळी मिळवले होते. पण भारताच्या वेगवान गोलंदाजांकडून अजून तिखट मारा करणे अपेक्षित आहे.

श्रीलंकेच्या संघात युवा खेळाडूंचा भरणा  आहे आणि त्यांच्या कामगिरीमध्ये सातत्य पाहायला मिळत नाही. त्यामुळेच त्यांना पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात संघात लहिरु थिरीमानेला संधी देण्यात आली आहे, हे श्रीलंकेच्या पथ्यावर पडू शकते. कर्णधार दिनेश चंडिमल, अँजेलो मॅथ्यूज या दोघांकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा चांगला अनुभव आहे, त्यामुळे या दोघांनी संघाला दिशा देण्याचे काम करणे भाग आहे. नुवान प्रदीप या एकमेव गोलंदाजाला गेल्या सामन्यात चांगली गोलंदाजी करता आली होती. पहिल्या डावात त्याने सहा बळी मिळवले होते. पण अन्य गोलंदाजांना मात्र त्याला चांगली साथ देता आली नव्हती.

दोन्ही संघांचा विचार केला तर भारताचे पारडे श्रीलंकेपेक्षा नक्कीच वरचढ आहे. भारताचा संघ चांगल्या फॉर्मात आहे. प्रत्येक खेळाडू झोकून देऊन कामगिरी करत आहे. दुसरीकडे आपल्या घरच्या मैदानात कधीही पुनरागमन करण्याची क्षमता श्रीलंकेमध्ये आहे. त्यामुळे श्रीलंकेला कमी लेखण्याची घोडचूक भारतीय संघाने करू नये. पण जर भारताने या सामन्यात लौकिकाला साजेशी कामगिरी केली तर ते नक्कीच मालिका जिंकू शकतील.

प्रतिस्पर्धी संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), इशांत शर्मा, उमेश यादव, हार्दिक पंडय़ा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, अभिनव मुकुंद.

श्रीलंका : दिनेश चंडिमल (कर्णधार), अँजेलो मॅथ्यूज, उपुल थरंगा, दिमुथ करुणारत्ने, निरोशन डिकवाला (यष्टीरक्षक), कुश मेंडिस, धनंजय डी’सिल्व्हा, दनुष्का गुणतिलका, लहिरू कुमारा, विश्वा फर्नाडो, नुवान प्रदीप, रंगना हेराथ, दिलरुवान परेरा, मलिंडा पुष्पकुमारा, लकशन संदाकन, लहिरु थिरीमाने.

  • वेळ : सकाळी १०.०० वा. पासून
  • थेट प्रक्षेपण : टेन वाहिन्यांवर.