Commonwealth Weightlifting Championship : युवा ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णकमाई करणारा भारताचा वेटलिफ्टर जेरेमी लालरिनुंगा याने जागतिक पातळीवर दमदार कामगिरी केली. Commonwealth Weightlifting Championship स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी (गुरुवारी) त्याने एका प्रयत्नात तब्बल ३ विक्रम मोडीत काढले. १६ वर्षाच्या जेरेमीने दिमाखदार कामगिरी करताना ६७ किलो वजन गटात स्नॅचमध्ये १३६ किलो वजन उचलण्याचा पराक्रम केला. त्याच्या या उचलीमुळे त्याने थेट युवा विश्वविक्रम, आशियाई स्पर्धांमधील विक्रम आणि राष्ट्रकुल स्पर्धांमधील विक्रम असे ३ विक्रम मोडून टाकले. या आधीचा युवा विश्वविक्रम आणि आशियाई विक्रम हा देखील जेरेमीच्याच नावावर होता. त्याने एप्रिल महिन्यात चीनच्या निग्बो येथे १३४ किलो वजन उचलण्याचा पराक्रम केला होता.

जेरेमीने एकाच प्रयत्नात दमदार कामगिरी करून ३ विक्रम मोडले, पण क्लीन-जर्क प्रकारात वजन उचलू शकला नाही. त्यामुळे त्याने उचललेले एकूण वजन हे गोल्ड लेव्हल ऑलिम्पिक पात्रता निकषांपेक्षा खूपच कमी भरले. सध्या सुरु असलेली स्पर्धा ही गोल्ड दर्जाची ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा असून याचे गुण हे टोकियो ऑलिम्पिकच्या अंतिम रँकिंगमध्ये मोजण्यात येणार आहेत.

दरम्यान, भारतीय वेटलिफ्टर्सने Commonwealth Weightlifting Championship चांगली कामगिरी केली आहे. ९ जुलैला भारताची माजी वर्ल्ड चॅम्पियन वेटलिफ्टर मीराबाई चानूने देशाला सुवर्णपदक पटकावून दिले. मीराबाई चानूने वरिष्ठ महिलांमध्ये ४९ किलो गटात हा पराक्रम केला. मीराबाईने स्नॅचमध्ये ८४ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये १०७ किलो वजनासह एकूण १९१ किलो वजन उचलले. मीराबाई चानूनं एप्रिल महिन्यात चीनमध्ये झालेल्या आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यातही तिने चांगली कामगिरी केली होती.