विजयासाठी आवश्यक ३२८ धावांचे लक्ष्य अत्यंत सुनियोजित पद्धतीने गाठून भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या क्रिकेट कसोटीमध्ये मंगळवारी पाचव्या दिवशी तीन गडी राखून थरारक व अभूतपूर्व विजय नोंदवला. नवागतांचा भरणा असूनही अजिंक्य रहाणेच्या कुशल व कल्पक नेतृत्वाखाली भारतीय संघाने या मालिकेत मुरब्बी यजमानांना धूळ चारली आणि हा विजय अविस्मरणीय ठरला.

शुभमन गिल (९१) आणि ऋषभ पंतच्या (८९ नाबाद) नीडर फटकेबाजीला चेतेश्वर पुजाराच्या (५६) भक्कम फलंदाजीची साथ मिळाली आणि ब्रिस्बेनच्या गॅबा मैदानावर ४३ वर्षांत प्रथमच ऑस्ट्रेलियाला पराभवाची झळ लागली. मालिकेत २-१ अशा विजयासह भारताने बॉर्डर-गावस्कर करंडक राखलाच, शिवाय आयसीसी कसोटी स्पर्धा गुणतक्त्यात अव्वल स्थानावरही झेप घेतली.

लक्षावधी क्रिकेट रसिक आणि माजी क्रिकेटपटू तसेच विश्लेषकांच्या मते भारताचा हा कसोटी इतिहासातील सर्वोत्तम विजय ठरला. सामन्यातील भारताचे पाचही गोलंदाज – सिराज, ठाकूर, सैनी, नटराजन, सुंदर – अत्यंत अननुभवी होते. तरीही त्यांनी या सामन्यात प्रतिस्पर्धी संघाचे २० गडी गारद करून दाखवले. शार्दूल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांची पहिल्या डावातील १२३ धावांची विक्रमी भागीदारी या सामन्यात भारतीय आव्हान जिवंत ठेवण्यात अत्यंत मोलाची ठरली. खरे तर हा कसोटी सामना अनिर्णीत ठेवूनही भागण्यासारखे होते, कारण बॉर्डर-गावस्कर करंडक तरीही भारताला राखता आला असता. पण शेवटच्या दिवशी भारतीय संघाने बचावात्मक मानसिकतेलाच तिलांजली दिली होती. पुजाराने एक बाजू लावून धरल्यावर शुभमन गिल, अजिंक्य रहाणे, वॉशिंग्टन सुंदर, मयांक अगरवाल आणि अखेरीस ऋषभ पंतने आक्रमक खेळून ऑस्ट्रेलियाला संधीच दिली नाही. गॅबा मैदानावर यापूर्वी चौथ्या डावात कोणत्याही संघाला २००हून अधिक धावा विजयासाठी बनवता आल्या नव्हत्या. तो इतिहास मंगळवारी पुसला गेला.

भारताने ही मालिका २-१ अशी जिंकली. ती ०-४ अशी गमवावी लागणार असा अंदाज भल्याभल्या माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी व्यक्त केला होता. पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात अवघ्या ३६ धावांमध्ये उखडले गेल्यानंतर कोणीही भारताला फारशी संधी देऊ इच्छित नव्हते. त्यातच कर्णधार विराट कोहली उर्वरित मालिकेत खेळणार नव्हता आणि भारताचे सर्व प्रमुख गोलंदाज, तसेच दोन मधल्या फळीतील फलंदाज जायबंदी होत गेले. तशाही परिस्थितीत मेलबर्न कसोटीत संस्मरणीय विजय, सिडनी कसोटी जिगरबाज खेळून अनिर्णीत राखणे आणि ब्रिस्बेन कसोटीत ऐतिहासिक विजय अशी कामगिरी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने करून दाखवली. हे घडत असताना समोर ऑस्ट्रेलियन संघ मात्र जवळपास सर्व सामने पूर्ण क्षमतेने खेळला, हे विशेष.

भारतीय क्रिकेटसाठी हा अत्यंत जादुई क्षण आहे. या युवा संघाला सामना केवळ वाचवायचा नव्हता, तर तो जिंकून मालिकेचा शेवट धडाकेबाज करायचा होता. हा युवा भारताचा विजय आहे. युवा भारत कोणालाही घाबरत नसल्याचा हा पुरावा आहे.

– सुनील गावस्कर, विख्यात माजी फलंदाज व कर्णधार