तिसऱ्या कसोटीत भरताने इंग्लंडवर दहा गडी राखून विजय मिळवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दुसऱ्याच दिवशी पाहुण्यांचा पराभव झाला. पहिल्या डावात इंग्लंडने ११२ तर भारताने १४५ धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडचा डाव ८१ धावांत आटोपला आणि भारताला ४९ धावांचे आव्हान मिळाले. हे आव्हान सलामीवीर रोहित शर्मा (२५*) आणि शुबमन गिल (१५) यांनी सहज पूर्ण केले. सामना संपल्यावर अनेक माजी इंग्लिश खेळाडूंनी खेळपट्टीवर टीका केली. माजी कर्णधार मायकल वॉन याने आपल्या स्तंभातून ICCवर टीका केली आणि भारताच्या विजयाबद्दल महत्त्वाचे विधान केले.

Ind vs Eng: इंग्लंडच्या फलंदाजांची अवस्था भित्र्या सश्यासारखी!

“भारतासारख्या बलाढ्य देशांना जोपर्यंत ICCकडून सूट मिळत राहील तोवर ICCची अवस्था दात नसलेल्या श्वापदासारखी असेल. भारत हवं त्या पद्धतीने क्रिकेट खेळत आहे, खेळपट्ट्या तयार करून घेत आहे पण त्यामुळे कसोटी क्रिकेटला त्रास होतोय हे समजलं पाहिजे. भारताने तिसरी कसोटी जिंकली यात वाद नाही, पण तो विजय अगदीच उथळ होता. कारण त्या सामन्यात खेळ जिंकला नाही. भारताने इंग्लंडपेक्षा चांगली कामगिरी केली आणि सामना जिंकला. पण कसोटी क्रिकेटच्या दृष्टीने असे सामने फारसे योग्य नाहीत आणि आमच्यासारख्या माजी खेळाडूंनी याविरोधात आवाज उठवणे हे आमचं कर्तव्य आहे”, असं रोखठोक मत डेली टेलिग्राफच्या स्तंभात वॉन याने मांडले.

‘टीम इंडिया’च्या तडाखेबाज फलंदाजाचा क्रिकेटला ‘रामराम’

अशी रंगली तिसरी कसोटी

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या इंग्लंडचा पहिला डाव ११२ धावांत आटोपला. त्यात केवळ झॅक क्रॉलीने अर्धशतक केले. तर अक्षर पटेलने ३८ धावांत ६ बळी टिपले. त्यानंतर भारताचा पहिला डावही स्वस्तात संपला. रोहितच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताला कशीबशी १४५ धावांपर्यंत मजल मारणं शक्य झालं. कर्णधार जो रुटने अवघ्या ८ धावा देत ५ गडी टिपले. इंग्लंडचा दुसरा डावही लवकर संपुष्टात आला. अक्षरचे ५ तर अश्विनचे ४ बळी यांच्या जोरावर इंग्लंड ८१ धावांत गारद झाला. त्यानंतर चौथ्या डावात भारताने बिनबाद विजयासाठी आवश्यक असलेलं लक्ष्य गाठलं. सामन्यात ११ बळी टिपणारा अक्षर पटेल सामनावीर ठरला.