इंडियन बॅडमिंटन लीगमधील सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू या बहुचर्चित लढतीला जमलेली अलोट गर्दी.. दोघींकडून होणारी एकापेक्षा सरस फटक्यांची आतषबाजी.. सिंधूने सुरुवातीला घेतलेली आघाडी.. मात्र आपणही काही कमी नाही, हे दाखवत सायनाने सामन्यावर गाजविलेले वर्चस्व.. सायनाला मिळणारा प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.. अशा स्थितीत कामगिरी उंचावून सिंधूवर सहज मात करून आपणच देशातील ‘फुलराणी’ असल्याचे सायनाने दाखवून दिले. सायनापाठोपाठ एस. टॅनोंगसॅक आणि प्रज्ञा गद्रे-व्ही शेम गोह यांनी केलेल्या अप्रतिम कामगिरीमुळे हैदराबाद हॉटशॉट्सने अवध वॉरियर्सवर ३-२ अशी मात केली.
एस. टॅनोंगसॅकने सुरुवातीच्या लढतीत आरएमव्ही गुरुसाईदत्त याच्यावर १५-२१, २१-१४, ११-९ अशी मात करून हैदराबादला १-० अशी आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर आयबीएलमधील सायना विरुद्ध सिंधू या लढतीकडे सर्वाच्या नजरा खिळल्या होत्या. सायनाने ही लढत २१-१९, २१-८ अशी सहज जिंकली. या मोसमात एकही जेतेपद आपल्या नावावर करता न आलेल्या सायनाला सुरुवातीला गुण मिळवण्यासाठी धडपडावे लागत होते. सिंधूने ड्रॉप-शॉट्स आणि स्मॅशेसचे अचूक फटके लगावत चांगली सुरुवात केली होती. १०-१४ अशा पिछाडीनंतर सायनाने गिअर बदलला आणि लागोपाठ गुण मिळवत १७-१५ अशी आघाडी घेतली. सिंधूने संयमी खेळ करत १७-१७ अशी बरोबरी साधली. सायनाने एक गेम पॉइंट गमावल्यानंतर स्मॅशचा अचूक फटका लगावत पहिल्या गेमवर नाव कोरले.
दुसऱ्या गेममध्ये सिंधूला आपल्या क्षमतेनुसार खेळ करता आला नाही. तिच्या भात्यातून अचूक आणि दमदार फटक्यांची बरसात होत नव्हती. तिच्या चुकीच्या फटक्यांमुळे सायनाने १४-६ अशी भक्कम आघाडी घेतली होती. रॅलीवर भर देणाऱ्या सायनाला चुका करण्यास सिंधूला भाग पाडता आले नाही. अखेर दुसरा गेम आरामात जिंकून सायनाने हैदराबादला २-० अशी आघाडी मिळवून दिली.
तिसऱ्या सामन्यात बाजी मारून लढतीवर निर्विवाद वर्चस्व गाजवण्याचा हैदराबादचा प्रयत्न होता. पण अवध वॉरियर्सच्या मथियास बोए आणि मार्सिस किडो यांनी पुरुष दुहेरीच्या सामन्यात खिम वाह लिम आणि व्ही. शेम गोह या हैदराबादच्या जोडीवर २१-१४, २१-२० असा विजय मिळवून दिला. पुरुष एकेरीच्या चौथ्या सामन्यात अवधच्या के. श्रीकांतने हैदराबादच्या अजय जयरामला २१-१७, २१-१९ अशी धूळ चारून सामन्यात २-२ अशी बरोबरी साधली. प्रज्ञा गद्रे-गोह (हैदराबाद) आणि किडो-टी. सापसिरी (अवध) यांच्यातील मिश्र दुहेरीच्या सामन्यातून विजेत्याचा फैसला होणार होता. गद्रे-गोह जोडीने पहिला गेम २१-९ असा सहज जिंकला. दुसऱ्या गेममध्येही त्यांनी ११-७ अशी आघाडी घेतली. पण किडो-सापसिरी जोडीने मोक्याच्या क्षणी खेळ उंचावून १३-१३ अशी बरोबरी साधून १७-१४ अशी आघाडी घेतली. गद्रेच्या चुकीच्या फटक्यांमुळे किडो-सापसिरी जोडीने हा गेम २१-१८ असा जिंकून बरोबरी साधली. निर्णायक गेममध्ये अवध वॉरियर्सने ४-१ अशी आगेकूच केली होती. पण गद्रे-गोह जोडीने सुरेख खेळाचे प्रदर्शन करून हा गेम ११-८ असा जिंकून हैदराबाद हॉटशॉट्सला ३-२ असा विजय मिळवून दिला.

सिंधूने सामन्याच्या सुरुवातीला मला अडचणीत आणले होते. पण प्रेक्षकांच्या पाठिंब्यामुळे मला सर्वोत्तम कामगिरी साकारता आली. चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकले, यातच मी समाधानी आहे. सिंधूचा खेळ पाहून तिचे भवितव्य उज्ज्वल आहे, असेच मी सांगेन!
सायना नेहवाल, हैदराबाद हॉटशॉट्स

कश्यपला पराभवाचा धक्का
इंडियन बॅडमिंटन लीगमधील सलामीच्या सामन्यात बांगा बीट्सचा प्रमुख खेळाडू पारुपल्ली कश्यप याला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. मात्र नंतरचे दोन सामने जिंकून बांगा बीट्सने मुंबई मास्टर्सविरुद्धच्या लढतीत रंगत आणली होती.
कश्यपने खणखणीत फटके लगावत चांगली सुरुवात केली खरी पण त्याला मुंबईच्या व्लादिमिर इव्हानोव्हकडून १८-२१, १८-२१ असा पराभव पत्करावा लागला. सामन्यात केलेल्या असंख्य चुका कश्यपला भोवल्या. महिला एकेरीत मुंबई मास्टर्सची हुकुमी खेळाडू टिने बाऊनला ताय झू यिंग हिने हरवून सामन्यात रंगत आणली. यिंग हिने हा सामना १७-२१, १८-२१ असे असा खिशात घातला. त्यानंतर पुरुष दुहेरीच्या लढतीवर सर्वाचे लक्ष लागले होते. प्रणव चोप्रा-मनू अत्री या मुंबईच्या जोडीचा कार्स्टन मोगेन्सन-अक्षय देवलकर यांनी १३-२१, १२-२१ असा पाडाव करत बांगा बीट्सला २-१ असे आघाडीवर आणले होते.