भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. विजडन अलमॅनाकने २०१० ते २०२० या दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू म्हणून त्याची निवड केली आहे. सचिनला ९०च्या दशकातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू, तर कपिल देवचा ८० दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून गौरव करण्यात आला आहे. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांना ५० वर्षे पूर्ण झाल्याने दशकातील पाच एकदिवसीय क्रिकेटपटूंची निवड करण्यात आली आहे. १९७१ ते २०२१ या कालावधीतील पाच क्रिकेटपटूंना हा मान देण्यात आला आहे.

भारतीय कर्णधार विराट कोहलीने २००८ साली श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. विराटने २५४ एकदिवसीय सामन्यात १२ हजार १६९ धावा केल्या आहेत. विश्वचषक २०११च्या विजेता संघाचा सदस्य असलेल्या विराटने दहा वर्षात ११ हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. त्यात ४२ शतकांचा समावेश आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि कपिल देव यांनाही मान मिळाला आहे. ९०च्या दशकात केलेल्या कामगिरीसाठी सचिनची निवड करण्यात आली आहे. सचिनने १९९८मध्ये ९ शतकं झळकावली होती. तर कपिल देवला ८० च्या दशकातील कामगिरीसाठी मान देण्यात आला आहे. कपिल देवच्या नेतृत्वाखालील संघाने १९८३ साली भारताला विश्वचषक जिंकून दिला होता. या दशकात कपिलने सर्वाधिक गडी बाद केले होते. सर्वाधिक स्ट्राइक रेटने १ हजाराहून अधिक धावा केल्या होत्या.

IPL 2021: राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स; यष्टीरक्षक कर्णधार आमनेसामने

इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सची सलग दूसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ट क्रिकेटर म्हणून निवड केली आहे. ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी हिला सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटर म्हणून गौरविण्यात आलं आहे. तर वेस्टइंडीजच्या कीरॉन पोलार्डला सर्वोत्कृष्ट टी २० क्रिकेटपटू म्हणून निवडलं आहे.