टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी कसोटी संघात निवड झालेला जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराजवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सिराजचे वडील मोहम्मद घौस यांचं हैदराबादमध्ये प्रदीर्घ आजाराने निधन झालं आहे, ते ५३ वर्षांचे होते. सिडनीत सराव करत असताना सिराजला आपल्या वडिलांच्या निधनाविषयी माहिती समजली.

“माझे बाबा नेहमी म्हणायचे की माझा मुलगा देशाचं नाव मोठं करेल. आता मी बाबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अधिक कठोर मेहनत घेईन. माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाबांनी रिक्षा चालवत अनेक कष्ट केले आहेत. माझ्यासाठी ही खरंच धक्कादायक गोष्ट होती. माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा आधार मी गमावला. मला देशाकडून खेळताना पाहणं हे त्यांचं स्वप्न होतं.” सिराज सिडनीवरुन Sportstar संकेतस्थळाशी बोलत होता.

२०१६-१७ च्या रणजी हंगामात हैदराबादकडून खेळत असताना सिराजने ४१ बळी घेत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. यानंतर सिराजला आयपीएलमध्ये RCB च्या संघाकडून संधी मिळाली. तेराव्या हंगामात सिराजने RCB कडून खेळताना आश्वासक मारा केला होता.