सनरायझर्स हैदराबादचा यष्टीरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहाने करोना चाचणीबाबत अफवा पसरवू नका, असे सांगितले आहे. माझी एक चाचणी पॉझिटिव्ह आणि एक चाचणी निगेटिव्ह आल्याचे साहाने सांगितले. काल शुक्रवारी अनेक माध्यमांनी साहाला पुन्हा करोना झाल्यासंबंधी वृत्त दिले होते. त्यानंतर साहाने आपली प्रतिक्रिया दिली.

साहा दिल्लीत क्वारंटाइनमध्ये असून त्याची प्रकृती आधीपेक्षा उत्तम आहे. साहा ट्वीटमध्ये म्हणाला, “माझा क्वारंटाइन कालावधी अजून संपलेला नाही. दैनंदिन चेकअप म्हणून दोन चाचण्या झाल्या आहेत, त्यातील एक निगेटिव्ह आहे आणि दुसरी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती उत्तम आहे. माझ्या करोना चाचण्यांबद्दल कोणतीही अफवा पसरवू नका, असे मी आवाहन करतो.”

 

४ मे रोजी हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यापूर्वी साहा करोना पॉझिटिव्ह आढळला होता. आयपीएल २०२१चा हंगाम त्याच दिवशी पुढे ढकलण्यात आला. साहा एका वृत्तसंस्थेला म्हणाला, “मेच्या पहिल्या दिवशी सरावानंतर मला थकवा जाणवत होता. मला थंडी वाटत होती. त्याच दिवशी मी डॉक्टरांना सांगितले. त्याच दिवशी करोना चाचणी घेण्यात आली. दुसर्‍या दिवशी ही चाचणी निगेटिव्ह आली. दुसर्‍या दिवशी पुन्हा चाचणी केली आणि ही चाचणीही निगेटिव्ह आली. पण तरीही मला तापामुळे सर्वांसह सामील करण्यात आले नाही. तिसर्‍या दिवशी चाचणी केली ती पॉझिटिव्ह आली.”

 

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या वीस सदस्यांमध्ये संघात वृद्धिमान साहाचा समावेश करण्यात आला आहे. तो पूर्णपणे बरा झाल्यानंतर तो संघासह जाऊ शकेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याव्यतिरिक्त भारताला इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिकादेखील खेळायची आहे.