भारतीय संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंत खऱ्या अर्थाने ऑस्ट्रेलिया दौरा गाजवत आहे. यष्ट्यांमधील स्लेजिंग असो किंवा सर्वाधिक झेल पकडण्याचा विक्रम असो ऋषभ पंत यजमान संघाला सर्वच आघाड्यांवर धोबीपछाड दिली आहे. चौथ्या कसोटीमध्ये पंतने दमदार दीड शतकी खेळी करत आपण नाणं फलंदाजीमध्येही खणखणीत वाजतयं हे दाखवून दिले आहे. जडेजा ८१ धावांवर बाद झाल्यानंतर कोहलीने डाव घोषित केला. मात्र चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ भारतीय पाठिराख्यांनी खऱ्या अर्थाने साजरा केला. पंतची खेळी पाहून तर काही चाहत्यांनी चक्क ऋषभ पंत सॉग तयार केले आणि मैदानामध्ये ते गायले. या गाण्याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी हनुमा विहारी बाद झाल्यानंतर पंत सातव्या क्रमांकावर मैदानामध्ये उतरला. आक्रामक खेळी करत पंतने अवघ्या १८९ चेंडूमध्ये १५९ धावांची नाबाद खेळी केली. पंतच्या या खेळीमध्ये त्याने चौकार आणि षटकारांचा रतीबच लावला होता. एकदिवसीय सामन्याप्रमाणे खेळताना त्याने अनेक फटके थेट हवेमध्ये मारत भराभर धावा जमवल्या. पंतची ही खेळी पाहून मैदानामधील भारतीय पाठिराख्यांनी त्याच्यावर थेट गाणेच तयार केले. बरं हे गाणे त्यांनी पंजाबी धून वाजवत गायलेही.

‘पंत तुम्हाला षटकार मारेल,
पंत तुमची पोरं संभाळेल,
पंत सगळं काही करेल

असे या गाण्याचे बोलं आहेत. टीम पेनने तिसऱ्या कसोटीमध्ये स्लेजिंग करताना पंतला तू माझी पोरं संभाळ मी पत्नीला फिरायला घेऊन जातो असा टोमणा मारला होता. त्यानंतर पंतनेही ऑस्ट्रेलियन संघ फलंदाजी करत असताना टीम पेनला ‘तात्पुरता कर्णधार’ म्हणत त्याचा वचपा काढला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांच्या घरी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमामध्ये पेनच्या पत्नीने ऋषभबरोबर काढलेला फोटो इन्स्ताग्रामवर पोस्ट करत तो सर्वोत्तम बेबीसीटर आहे असं म्हटलं होतं. त्यामुळेच मैदानात आणि मैदानाबाहेर केवळ भारतीयच नाही तर ऑस्ट्रेलियन चाहतेही पंतच्या प्रेमात पडले आहेत. याच पार्शवभूमीवर पंत सगळं काही करु असं म्हणत भारतीय चाहत्यांनी हे गाणे तयार केले आहे. मैदानातील भारतीय पाठीराखे एकाच वेळी हे गाणे गात नाचतानाही या व्हिडीओमध्ये दिसत आहे. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ…

रविंद्र जडेजाच्या सोबतीने पंतने चौथ्या कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियन संघांच्या गोलंदाजांच्या नाकीनऊ आणले. कसोटीमध्ये अगदी एकदिवसीय क्रिकेटसारखा खेळ करत दोघांनीही भारतीय संघाचा स्कोअरबोर्ड ६२२ धावांपर्यंत पोहचवला.