गेले काही दिवस भारतीय महिला क्रिकेट संघासाठी चांगले नव्हते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताला 1-4 असा पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर टी-20 मालिकेतही संघ 0-2 असा पिछाडीवर पडला. रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात आफ्रिकेने भारताला 6 गडी राखून मात दिली. त्यामुळे भारतीय महिला क्रिकेट संघाची कामगिरी अपेक्षेनुसार चांगली झाली नाही. मात्र, संघाची फिरकीपटू राधा यादवने टी-20 क्रिकेटमध्ये खास विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

राधाने महिला टी-20 क्रिकेटमध्ये सलग 25 डावात किमान एक तरी गडी बाद करण्याचा विश्वविक्रम केला आहे. इतकेच नव्हे, तर ती टी-20 क्रिकेटमध्ये 50 गडी बाद करणारी जगातील तिसरी युवा गोलंदाज  आणि भारताची पहिली गोलंदाज ठरली आहे. कारकिर्दीचा 36वा टी-20 सामना खेळत राधाने ही कामगिरी केली. आफ्रिकेची लीझेल ली ही राधाची 50वी विकेट ठरली.

 

नाहीदा अख्तर अग्रस्थानी

हा विक्रम करताना राधाचे वय 20 वर्ष 334 दिवस असे होते. सर्वात कमी वयात 50 फलंदाजांना माघारी धाडणाऱ्या महिला खेळाडूंच्या यादीत बांगलादेश संघाची नाहीदा अख्तर अग्रस्थानी आहे. तिने वयाच्या 20 वर्षातच हा कारनामा आपल्या नावावर केला होता. तर, दुसऱ्या स्थानी इंग्लंड संघाची महिला खेळाडू सोफी एक्लेस्टोन आहे. तिने हा 20 वर्ष आणि 300 दिवस असे वय असताना ही कामगिरी केली होती. सोफीने आतापर्यंत 42 सामन्यात 61 गडी बाद केले आहेत.

भारताचा सलग दुसरा पराभव

दोन चेंडूत सहा धावांची आवश्यकता असताना वेगवान गोलंदाज अरुंधती रेड्डीने टाकलेल्या नो-बॉलमुळे दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने दुसऱ्या टी-20 सामन्यांत अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला. आफ्रिकेने भारताचे आव्हान 6 गडी राखून पार करत तीन सामन्यांच्या या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली.

भारताचे 159 धावांचे आव्हान पार करताना सलामीवीर लिझेली ली आणि लॉरा वोल्वार्ट यांनी दमदार अर्धशतके साजरी केली. लिझेलीने 70 धावा फटकावत विजयात योगदान दिले. अखेरच्या क्षणी लॉराने नाबाद 53 धावा फटकावत दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून दिला. आफ्रिकेचा हा भारतावरील पहिला टी-20 मालिकाविजय ठरला. तत्पूर्वी, सलामीवीर शफाली वर्मा आणि रिचा घोष यांच्या अप्रतिम योगदानामुळे भारतीय महिला क्रिकेट संघाला 20 षटकांत 4 बाद 158 धावा करता आल्या.