भारताचे नितीन मेनन यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवरील (आयसीसी) मुख्य पंचांमध्ये स्थान मिळवले आहे. मेनन हे ‘एलिट’ पंचांमध्ये स्थान मिळवणारे सर्वात तरुण पंच ठरले आहेत. आगामी २०२०-२१ हंगामासाठी इंग्लंडच्या नायजेल लाँग यांच्या जागी मेनन यांची निवड झाली आहे. ३६ वर्षीय मेनन यांनी तीन कसोटी, २४ एकदिवसीय आणि १६ ट्वेन्टी-२० लढतींमध्ये पंच म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

‘आयसीसी’च्या मुख्य पंचांमध्ये स्थान मिळवणारे मेनन हे श्रीनिवास वेंकटराघवन आणि सुंदराम रवी यांच्यानंतर भारताचे तिसरे पंच आहेत. ‘‘आयसीसीच्या जगातील मुख्य पंच आणि सामनाधिकाऱ्यांमध्ये स्थान मिळवावे, हे सुरुवातीपासून स्वप्न होते. अजूनही विश्वास बसत नाही,’’ असे मेनन यांनी सांगितले.