खराब कामगिरी आणि ढासळणारी तंदुरुस्ती या आव्हानांना बाजूला सारत इंडोनेशियन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याची सायना नेहवालला संधी आहे. सायनाने तीनदा या स्पध्रेचे विजेतेपद पटकावले आहे. याचप्रमाणे गतविजेतेपद आपल्याकडेच राखण्यासाठी सायना प्रयत्नशील आहे.
नुकत्याच झालेल्या थायलंड ग्रां. प्रि. गोल्ड स्पर्धेत सायनाला दुसऱ्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धा आणि स्विस खुल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत सायनाने मजल मारली. मात्र गेल्या वर्षी ऑक्टोबरनंतर कोणत्याही मोठय़ा स्पर्धेत सायनाला दिमाखदाय यश मिळवता आले नव्हते. क्रमवारीत तुलनेने बऱ्याच मागे असलेल्या खेळाडूंनी सायनाला नमवले होते. या पाश्र्वभूमीवर सायनाला या स्पर्धेत जेतेपदासाठी बरीच मेहनत करावी लागणार आहे.
सायनाची सलामीची लढत इंडोनेशियाच्या लिंडावेनी फेइन्ट्रीशी होणार आहे. प्राथमिक फेरीचा अडथळा ओलांडल्यास उपांत्यपूर्व फेरीत तिच्यासमोर सातव्या मानांकित शियान वांगचे आव्हान असणार आहे. शियानला नमवल्यास सायनाला चौथ्या मानांकित ज्युलियन शेंकशी मुकाबला करावा लागणार आहे. अव्वल मानांकित ली झेरुई, तृतीय मानांकित यिहान वांग आणि पाचव्या मानांकित रत्नाचोक इनथॅनॉन दुसऱ्या गटात आहेत.
पुरुष गटात जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानी असलेला पी. कश्यपची सलामीची लढत क्रमवारीत १९व्या स्थानी असलेल्या जपानच्या शो सासाकीशी होणार आहे. २००८मध्ये इंडिया ग्रां. प्रि. गोल्ड स्पर्धेत सासाकीविरुद्ध खेळताना कश्यपला पराभवाला सामोरे जावे लागले होते. सासाकीचा अडथळा पार केल्यास कश्यपचा मुकाबला आठव्या मानांकित थायलंडच्या बूनसुक पोनसन्नाशी होणार आहे. नुकत्याच झालेल्या थायलंड ग्रां. प्रि. स्पर्धेत भारताच्या के. श्रीकांतने पोनसन्नाचा पराभव करत जेतेपद पटकावले होते.
अन्य लढतींमध्ये, जागतिक क्रमवारीत ३७व्या स्थानी असलेल्या सौरभ वर्माची सलामीची लढत १५व्या स्थानी असलेल्या हान्स क्रिस्टियन विटिनगुसशी होणार आहे. अजय जयराम आणि आरएमव्ही गुरुसाईदत्तला पात्रता फेरीचा अडथळा पार करावा लागेल. महिला दुहेरीत प्रज्ञा गद्रे आणि अश्विनी पोनप्पा जोडीचा मिंगटिआन फू आणि लेई यो जोडीशी सामना होणार आहे. मिश्र दुहेरीत अश्विनी तरुण कोना जोडी प्रवीण जॉर्डन आणि विटा मारिसा जोडीविरुद्ध खेळणार आहे.