कोहलीच्या दमदार शतकी खेळानंतरही भारतीय संघाला तीन सामन्यांच्या मालिकेतील सलामीच्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. भारतीय संघाची विजयी घौडदौड रोखत न्यूझीलंड मालिका विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. त्यामुळे पुण्याच्या मैदानात न्यूझीलंडला रोखून मालिका वाचवण्याचे आव्हान भारतीय संघासमोर आहे. न्यूझीलंडला रोखून मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारतीय संघाने मैदानात काही गोष्टींमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे.

१. ठराविक अंतरावर विकेट्स मिळवण्याची रणनिती
पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडला सुरुवातीला धक्का दिला. चांगल्या सुरुवातीनंतर भारतीय गोलंदाज न्यूझीलंडवर दबाव टाकण्यात अपयशी ठरले. रॉस टेलर आणि लॅथम यांना रोखण्यात भारतीय गोलंदाज अपयशी ठरले. त्यांच्यात झालेल्या मोठ्या भागीदारीमुळे भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. दुसऱ्या सामन्यात या चुका टाळून न्यूझीलंडच्या फलंदाजांवर अंकुश ठेवण्यासाठी ठराविक अंतराने विकेट्स मिळवण्यासाठी भारताला खास रणनितीचा उपयोग करावा लागेल.

२. दिनेश कार्तिकला बढती
भारतीय संघात सध्या दिनेश कार्तिकला संधी दिली जात आहे. मागील सामन्यातील कामगिरीनंतर त्याला केदार जाधवऐवजी चौथ्या क्रमांकावर पाठवल्यास भारतीय संघासाठी फायदेशी ठरेल. विराट हा बदल करेल का? हे पाहणे औत्सुकतेचे असेल. दिनेश कार्तिकला बढती दिल्यास न्यूझीलंडच्या गोलंदाजावर दबाव टाकणे शक्य होईल.

३. केदार जाधवच्या गोलंदाजीचा योग्य वापर
केदार जाधवने अनेकदा त्याच्या गोलंदाजीने सेट झालेल्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे अनोख्या शैलीत भारताला यशाच्या मार्गावर घेऊन जाण्याची क्षमता असणाऱ्या केदारकडून गोलंदाजी करुन घेणे देखील भारतासाठी जमेची बाजू ठरेल. केदारने १७ डावांत १६ बळी टिपले आहेत. त्यामुळे भारतीय संघाला मालिकेत कमबॅक करण्यासाठी जाधवचा कोहली कसा वापर करतोय हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

४. पावर प्लेमध्ये स्पिनरचा वापर
सध्याच्या घडीला युजवेंद्र चहल आणि कुलदिप यादव चांगली कामगिरी करत आहेत. पावर प्लेमध्ये विराटने दोघांचा अधिकाधिक वापर करुन न्यूझीलंड फलंदाजांना रोखण्याचे प्रयत्न केल्यास भारताचा विजयाचा मार्ग सुकर होऊ शकतो.

५. सावध सुरुवात
पहिल्या सामन्यात भारतीय डावाची सुरुवात खराब झाली होती. बोल्टने भारतीय सलामीला सुरुंग लावला होता. परिणामी विराटच्या शतकी खेळीनंतरही भारताला २० ते ३० धावा कमी झाल्या. त्यामुळे मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी सलामीवीरांनी सावध सुरुवात करणे गरजेचे आहे.