इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघाने ७ गडी राखून विजय मिळवला. मुंबईच्या वानखेडे मैदानावर इंग्लंडने दिलेल्या १६२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मराठमोळ्या स्मृती मंधानाची अर्धशतकी खेळी आणि मिताली राज हिच्या ४७ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने सामना जिंकला. याबरोबरच ३ सामन्यांच्या मालिकेत भारताने २-० अशी विजयी आघाडी घेतली.

नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र कर्णधाराचा निर्णय फलंदाजांना सार्थ ठरवता आला नाही. इंग्लंडकडून स्कायव्हरने ८५ धावांची एकहाती झुंज दिली. तर विनफिल्ड (२८) आणि बेमॉण्ट (२०) यांनी काही काळ संघर्ष केला. या व्यतिरिक्त एकाही खेळाडूला दुहेरी धावसंख्या करता आली नाही. शिखा पांडे आणि झुलन गोस्वामी यांनी प्रत्येकी ४-४ बळी घेतले. तर पूनम यादवने २ बळी टिपले.

या आव्हानाचा पाठलाग करताना स्मृती मंधानाने आपली लय कायम राखत फलंदाजी केली. मात्र मुंबईकर जेमायमा रॉड्रिग्ज शून्यावर बाद झाली. त्यानंतर स्मृतीने पूनम राऊतसोबत डाव सावरला. पूनम ३२ धावांत बाद झाली. त्यानंतर मिताली राजच्या साथीने खेळत स्मृतीने अर्धशतक पूर्ण केले. स्मृती ६३ धावांवर बाद झाली. पण मितालीने ४७ धावांवर नाबाद राहून सामना जिंकवला.