साक्षी मलिकविरुद्धच्या सराव लढतीत डोक्याला दुखापत झाल्याने भारताच्या सोनम मलिकला गुरुवारपासून रंगणाऱ्या संयुक्त जागतिक मानांकन कुस्ती स्पर्धेतून (यूडब्ल्यूडब्ल्यू) माघार घ्यावी लागली आहे. याचप्रमाणे पुरुषांमध्ये दीपक पुनिया आणि रवी दहिया या कुस्तीपटूंनीदेखील विविध कारणास्तव स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

इटली येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारताने ३४ जणांचा चमू पाठवला असून बजरंग पुनिया आणि विनेश फोगट या चमूचे नेतृत्व करणार आहेत. ६२ किलो वजनी गटात सोनम भारताचे प्रतिनिधित्व करणार होती. परंतु लखनौ येथे गेल्या आठवडय़ात झालेल्या राष्ट्रीय शिबिरादरम्यान साक्षीविरुद्ध लढताना सोनमच्या डोक्याला जबर मार लागला. तिच्या डोक्यातून रक्त वाहू लागल्याने सराव तेथेच थांबवण्यात आला. पुढील तीन-चार आठवडे सोनमला विश्रांतीचे आदेश देण्यात आले आहेत.

दुसरीकडे डाव्या पायाच्या दुखापतीमुळे रवीने (५७ किलो) स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यालासुद्धा राष्ट्रीय शिबिरादरम्यानच ही दुखापत झाली. तर २०१९च्या जागतिक अजिंक्यपद विजेत्या दीपकला (८६ किलो) डेंग्यूची लागण झाल्याने तो या स्पर्धेत सहभागी होणार नाही. याव्यतिरिक्त जितेंदर किन्हाने (७४ किलो) खांद्याच्या दुखापतीमुळे स्पर्धा न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.