भारतीय संघ नजीकच्या काळात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. त्याआधी पाकिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलिया टी२० मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात नेतृत्वबदल करण्यात आला असून सलामीवीर ऍरॉन फिंच याच्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. पण त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे या मालिकेत आंतरराष्ट्रीय टी२० च्या इतिहासात आजपर्यंत न घडलेली बाब घडणार आहे. ऑस्ट्रेलिया या संघात २ उपकर्णधार खेळवणार आहे.

पाकिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ युएईमध्ये टी२० मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी जाहीर करण्यात आलेल्या संघात वेगवान गोलंदाज मिचेल मार्श आणि फलंदाज अलेक्स कॅरी या दोघांना उपकर्णधारपद देण्यात आले आहे. त्यामुळे या टी२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ १ कर्णधार आणि २ उपकर्णधार यांच्यासमवेत मैदानात उतरणार आहे.

याआधी झालेल्या कसोटी मालिकेतही ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन याला सहकार्य करण्यासाठी मिचेल मार्श आणि जोश हेजलवूड यांना उपकर्णधार म्हणून नेमण्यात आले होते. हाच फॉर्म्युला टी२०मध्येही ऑस्ट्रेलियाने कायम ठेवला आहे.

संघ – अॅरॉन फिंच (कर्णधार), मिचेल मार्श (उपकर्णधार), अॅलेक्स कॅरी (उपकर्णधार), अॅस्टन अगार, नॅथन कुल्टर-नाईल, ख्रिस लिन, नॅथन लायन, ग्लेन मॅक्सवेल, बेन मॅकडरमॉट, डार्सी शॉर्ट, बिल्ली स्टॅन्लेक, मिचेल स्टार्क, अँड्र्यू टाय, अॅडम झम्पा