‘उदयोन्मुख खेळाडूंना योग्य सुविधा पुरवण्याची गरज’

संघर्ष करून, खस्ता खाऊन खेळाडू पदक जिंकतो आणि त्यानंतर त्यांच्यासाठी मदतीचा ओघ सुरू होतो.. अत्याधुनिक सुविधा मिळतात. मात्र या सुविधा योग्य वेळी योग्य उदयोन्मुख खेळाडूंना दिल्यावर भारताची पदकसंख्या वाढेल, असे मत भारताची अव्वल थाळीफेकपटू कृष्णा पुनियाने व्यक्त केले. गुडघ्याच्या शस्त्रक्रियेमुळे काही काळ स्पर्धामधून विश्रांती घेणारी पुनिया ऑलिम्पिकसाठी सज्ज झाली आहे. ऑलिम्पिक स्पध्रेची पात्रता हमखास मिळवेन, असा विश्वास तिने व्यक्त केला. तिच्याशी केलेली बातचीत.
ल्ल ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा काही दिवसांत सुरु होत आहे आणि त्यासाठी कसा सराव सुरू आहे?
– जुलै महिन्याअखेपर्यंत आम्हाला ऑलिम्पिकमध्ये पात्रता मिळवण्याची संधी आहे. त्या दृष्टीने सरावही सुरू आहे. ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवेन, असा विश्वास आहे. तीन महिन्यांपूर्वी गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली असल्यामुळे सध्या तरी स्पर्धामध्ये सहभाग घेण्याचा विचार नाही. थाळीफेकीचा व्यायाम सोडल्यास थोडा थोडा व्यायाम करत होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच पुढील वाटचाल ठरवणार आहे. पूर्णपणे तंदुरुस्त वाटल्यानंतरच स्पध्रेत उतरणार आहे
ल्ल दुखापतीतून सावरून पुन्हा जुन्या फॉर्मात येणे, किती आव्हानात्मक आहे?
– शारीरिक तंदुरुस्ती चांगली आहे. थाळी फेकण्याचा व्यायाम दहा दिवसांपूर्वी सुरू केला आहे. त्यात हळूहळू सुधारणा करेन. इतका अनुभव पाठीशी असताना ऑलिम्पिक पात्रता मिळवण्यात काही अडचण येईल असे वाटत नाही. ऑलिम्पिक पात्रतेसाठी ६० मीटर अंतर पार करायचे आहे आणि ते सहज पार करेन.
ल्ल आता ऑलिम्पिक स्पध्रेसाठी खेळाडूंना विदेशात पाठवले जात आहे. चार वर्षांपूर्वी अशा योजना असत्या, तर लंडन ऑलिम्पिकमध्ये निकाल वेगळा पाहायला मिळाला असता का?
– नक्कीच पाहायला मिळाले असते. सरावाच्या दृष्टीने विचार केल्यास, तर भारतात पुरेशा सुविधा उपलब्ध आहेत. मात्र, येथील हवामान असे आहे, की दुखापतीतून सावरण्यासाठी वेळ जातो. विदेशात सावरायला अल्प कालावधी लागतो. तेथील वातावरण खेळाडूंसाठी पूरक असते. त्यामुळे तिथे जाऊन सराव करणे फायदेशीर आहे. जगातील अव्वल खेळाडूंविरुद्ध भारताच्या अव्वल खेळाडूंना अधिकाधिक स्पर्धा करण्याची संधी मिळाली पाहिजे. त्याने कामगिरीत सुधारणा होणार आहे.
ल्ल लक्ष्य ऑलिम्पिक योजनेचा खेळाडूंना किती फायदा होत आहे?
– दुखापत झाल्यामुळे या योजनेसाठी मी अर्ज पाठवलेला नाही. आपले बरेच खेळाडू विदेशात जाऊन सराव करत आहे, ही चांगली बाब आहे. मात्र, मागील ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुल स्पध्रेपूर्वीच्या तयारीशी तुलना केल्यास यात काही त्रुटी आहेत. यातील निवड प्रक्रिया कशी आहे, याबाबत मला माहिती नाही. मात्र, खूप कमी कालावधीसाठी परदेशात सराव करण्याची संधी मिळत आहे. गत राष्ट्रकुल स्पध्रेत आमच्यावर मर्यादा ठेवण्यात आल्या नव्हत्या. आम्ही कितीही कालावधीसाठी परदेशात सराव करू शकत होतो. आता अमुक इतक्या रुपयांमध्ये, अमुक कालावधी सराव करण्याचे बंधन आहे.
ल्ल ऑलिम्पिक पदकाच्या दृष्टीने विचार केल्यास, भारताची वाटचाल कशी सुरू आहे?
– खेळाडूंना जास्तीत जास्त सुविधा मिळत आहेत, ही चांगली बाब आहे; परंतु ‘स्पोर्ट्स मेडिसन’ या संकल्पनेबाबत दृष्टिकोन बदलाची आवश्यकता आहे, कारण स्पोर्ट्स मेडिसन म्हटले की, उत्तेजन सेवनाचा आपण विचार करतो. याहीपलीकडे ही संकल्पना वेगळी आहे. खेळाडू दुखापतग्रस्त असतानाही कशा प्रकारचे व्यायाम करू शकतो, कोणते आहार घेऊ शकतो, प्रत्येक खेळाडूसोबत फिजिओ असायला हवा आदी बाबी महत्त्वाच्या आहेत. आम्हाला हे सर्व पदक जिंकल्यानंतर मिळते. उदयोन्मुख खेळाडूंना या सुविधा मिळाल्यास भारताची पदक संख्या वाढेल.