विराट कोहलीच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू शेन वॉटसन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचे नेतृत्व करणार आहे. विराट कोहली आणि ए बी डिव्हिलीयर्स आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये दुखापतीमुळे खेळू शकणार नाहीत. त्यामुळे शेन वॉटसनकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचे नेतृत्व असेल.

आयपीएलच्या दहाव्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वीच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ दुखापतींमुळे बेजार झाला आहे. विराट कोहलीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या रांची कसोटीत खांद्याला दुखापत झाली. त्यामुळे कोहली धरमशालात झालेल्या शेवटच्या कसोटीत खेळू शकला नव्हता. विराट कोहली आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये खेळणार नाही. तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरी भारताच्या विजयात मोलाचा वाट उचलणारा के. एल. राहुल यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणार नाही. राहुलच्या खांद्याला दुखापत झाल्याने त्यावर सर्जरी करण्यात येणार आहे. फॉर्मात असलेला राहुल आयपीएलच्या एकाही सामन्यात खेळणार नसल्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच मोठा धक्का बसला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ ५ एप्रिलला आयपीएल-१० मधील पहिला सामना खेळणार आहे. या सामन्यात बंगळुरुच्या संघासमोर माजी विजेत्या सनरायझर्स हैदराबादचे आव्हान असणार आहे. कोहलीच्या अनुपस्थितीत डिव्हिलीयर्स संघाचे नेतृत्व करेल, असे बंगळुरु संघाच्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले होते. मात्र मायदेशात देशांतर्गत सामना खेळत असताना डिव्हिलीयर्सला पाठदुखीचा त्रास जाणवू लागला.
त्यामुळे त्याच्या उपस्थितीविषयी संघ व्यवस्थापनाला शंका आहे. त्यामुळे संघाची धुरा आता शेन वॉटसनकडे सोपवण्यात आली आहे.

दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज ए बी डिव्हिलीयर्सने चिन्नास्वामी स्टेडियमवर सराव केला. मात्र डिव्हिलीयर्सला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यास वेळ लागेल, असे बंगळुरु संघाचे प्रशिक्षक डॅनिअल व्हिटोरी यांनी म्हटले आहे.