आयपीएलच्या ११ व्या सिझनमध्ये आज दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब या संघांमध्ये सामना होत आहे. मोहाली येथील बिंद्रा स्टेडियम येथे हा सामना रंगणाला आहे. शनिवारी सुरु झालेल्या या आयपीएलच्या हंगामातील हा दुसरा सामना आहे. दिल्लीच्या संघाचा कर्णधार गौतम गंभीर आणि पंजाबच्या संघाचा कर्णधार आर. आश्विन यांची येथे कसोटी लागणार आहे.

पंजाबने नाणेफेक जिंकल्याने घरच्या मैदानावर होणाऱ्या या सामन्यात विजयासाठी त्यांना जोर लावावा लागणार आहे. आर. आश्विनच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या या सामन्यांत अनुभवी ख्रिस गेल आणि युवराज सिंग यांसारखे दिग्गज खेळाडू आहेत. तर दोन वेळेस आयपीएल जिंकलेल्या कोलकात्याच्या संघाचा कर्णधार गौतम गंभीर सारखा तगडा खेळाडू सध्या दिल्लीच्या संघाकडे आहे. त्याचबरोबर दिल्लीच्या संघात नव्या दमाचे आणि अनुभवी खेळाडू असा चांगला भरणा आहे. मात्र, गेल्या दोन सिझनमध्ये आपली विशेष चमक दाखवू न शकलेल्या या संघाला आता आपली ताकद दाखवून द्यावी लागणार आहे.

UPDATES :

किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाकडून ओपनिंगला आलेल्या लोकेश राहुलने दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या विरोधात आपल्या संघाला धडाकेबाज सुरुवात करुन दिली. याचबरोबर त्याने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतकाचा विक्रमही आपल्या नावावर केला आहे. राहुलने १४ चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकले. त्याच्या या विक्रमी अर्धशतकी खेळाच्या जोरावर पंजाबने १८ षटके ५ चेंडूंमध्येच १६७ धावांचे टार्गेट पूर्ण करीत दिल्लीवर दणदणीत विजय मिळवला.

मोहाली येथे सुरु असलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यामध्ये सुरु असलेल्या सामन्यांत टॉस हारल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या दिल्लीच्या संघाने ७ बळींच्या बदल्यात १६६ धावा केल्या. दिल्लीला पहिला झटका कॉलिन मुनरो (४) च्या रुपाने बसला. तसेच श्रेयस अय्यर (११) काही खास खेळी करु शकला नाही. मात्र, यावेळी कर्णधार गोतम गंभीर मैदानावर टिकून राहिला. त्याने ४२ चेंडूंमध्ये १ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ५५ धावा केल्या. त्याला ऋषभ पंतने (२८) चांगली साथ दिली.