महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्ज संघाने ६ गडी राखून दिल्ली कॅपिटल्स संघावर मात केली. या विजयासह चेन्नईचा संघ रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीत पोहचला असून, या लढतीत चेन्नईला मुंबईशी दोन हात करावे लागणार आहेत. बाराव्या हंगामात आतापर्यंत झालेल्या ३ सामन्यांमध्ये मुंबईने चेन्नईला पराभूत केलं आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात कोणता संघ बाजी मारतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान दिल्लीविरुद्ध सामन्यात चेन्नईच्या फलंदाजांनी १५२ धावांचं आव्हान ४ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. चेन्नईसाठी हा विजय अतिशय महत्वाचा मानला जात आहे. आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघाने आपल्या शंभराव्या विजयाची नोंद केली आहे. अशी कामगिरी करणारा चेन्नई आयपीएलमधला दुसरा संघ ठरला आहे. मुंबई इंडियन्सच्या नावावर आयपीएलमध्ये १०८ विजय जमा आहेत.

दरम्यान, १४८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सुरुवातीची षटके जपून खेळल्यानंतर फाफ डु प्लेसिस आणि वॉटसन यांनी चेन्नईला धमाकेदार सुरुवात मिळवून दिली. या दोघांनी आठव्या षटकात चेन्नईला अर्धशतकी सलामी करून दिली. यात डु प्लेसिसने फटकेबाजी केली, तर वॉटसनने संयमी पवित्रा राखला. आपली फटकेबाजी सुरु ठेवत फाफ डु प्लेसिस याने दमदार अर्धशतक पूर्ण केले. यासाठी त्याने ३७ चेंडू खेळले. डु प्लेसिसने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर लगेचच चेन्नईला धक्का बसला. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात डु प्लेसिस झेलबाद झाला. त्याने ३९ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकार लगावत ५० धावा केल्या. त्याने वॉटसन बरोबर ८१ धावांची सलामी दिली.

आधी संयमी खेळी आणि नंतर तुफानी अर्धशतक ठोकल्यानंतर शेन वॉटसन माघारी परतला. त्याने ३ चौकार आणि ४ षटकार यांच्या मदतीने ३२ चेंडूत ५० धावा केल्या. पाठोपाठ बाचकत फलंदाजी करणारा सुरेश रैनाही स्वस्तात तंबूत परतला. त्याने केवळ ११ धावा केल्या. विजयासाठी २ धावा आवश्यक असताना धोनीला विजयी षटकार मारण्याचा मोह आवरला. त्यातच तो बाद झाला. अखेर रायडूने विजयी फटका लगावत विजयाची औपचारिकता पूर्ण केले.

अवश्य वाचा – IPL 2019 : दिल्लीविरुद्ध हरभजन सिंह चमकला, १५० बळींचा टप्पा पूर्ण