13 July 2020

News Flash

IPL 2019 : चेन्नईचा नवा ‘चॅम्पियन’! केला हा विक्रम

दिल्लीविरुद्धच्या सामन्यात ब्राव्होने टिपले २ बळी

विशाखापट्टणम येथे झालेल्या क्वालिफायर २ सामन्यात चेन्नईने दिल्लीच्या संघावर ६ गडी राखून मात केली आणि स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. दिल्लीच्या संघाने विजयासाठी चेन्नईला १४८ धावांचे माफक आव्हान दिले होते. चेन्नईचे सलामीवीर शेन वॉटसन आणि फाफ डु प्लेसिस या दोघांच्या अर्धशतकांच्या जोरावर चेन्नईने सहज विजय मिळवला. आता स्पर्धेच्या विजेतेपदासाठी चेन्नईला मुंबईशी झुंजावे लागणार आहे.

या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा धोनीचा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. दिल्लीची फलंदाजी पुरती कोलमडली. ऋषभ पंत आणि कॉलिन मुनरोचा अपवाद वगळता दिल्लीचे फलंदाज चेन्नईच्या गोलंदाजीचा सामना करु शकले नाहीत. सलामीवीर पृथ्वी शॉला माघारी धाडत दिपक चहरने दिल्लीला पहिला धक्का दिला. यानंतर शिखर धवनही हरभजन सिंहच्या गोलंदाजीचा शिकार होऊन माघारी परतला. यानंतर प्रत्येक फलंदाज एका मागोमाग एक माघारी परतत राहिल्यामुळे दिल्लीचा संघ भागीदारी उभारु शकला नाही. मधल्या फळीत ऋषभ पंतने फटकेबाजी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ही मोठी खेळी करु शकला नाही. त्याने दिल्लीकडून ३८ धावा केल्या.

चेन्नईकडून दिपक चहर, हरभजन सिंह, रविंद्र जाडेजा, ड्वेन ब्राव्हो यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. इम्रान ताहीरने १ बळी घेत त्यांना चांगली साथ दिली. ब्राव्होच्या २ बळींमुळे ब्राव्होने एक विक्रम केला. ब्राव्होने चेन्नईकडून खेळताना १०० बळींचा टप्पा पूर्ण केला.चेन्नईकडून गोलंदाजी करताना सर्वाधिक बळी घेणाऱ्या यादीत ब्राव्हो अव्वल होताच. पण त्याचे या सामन्याआधी ९९ बळी होते. त्यामुळे चेन्नईकडून खेळताना बळींचे शतक पूर्ण करण्यासाठी त्याला केवळ १ गडी बाद करण्याची गरज होती. त्याने दिल्लीविरुद्धच्या सामन्यात २ बळी टिपले आणि चेन्नईकडून बळींचे शतक पूर्ण करणारा तो पहिला खेळाडू ठरला. या यादीत ९० बळींसह रविचंद्रन अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण आता त्याने चेन्नईचा संघ सोडला असून तो पंजाब संघाचे नेतृत्व करत आहे.

दरम्यान, १४८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सुरुवातीची षटके जपून खेळल्यानंतर फाफ डु प्लेसिस आणि वॉटसन यांनी चेन्नईला धमाकेदार सुरुवात मिळवून दिली. या दोघांनी आठव्या षटकात चेन्नईला अर्धशतकी सलामी करून दिली. यात डु प्लेसिसने फटकेबाजी केली, तर वॉटसनने संयमी पवित्रा राखला. आपली फटकेबाजी सुरु ठेवत फाफ डु प्लेसिस याने दमदार अर्धशतक पूर्ण केले. यासाठी त्याने ३७ चेंडू खेळले. डु प्लेसिसने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर लगेचच चेन्नईला धक्का बसला. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात डु प्लेसिस झेलबाद झाला. त्याने ३९ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकार लगावत ५० धावा केल्या. त्याने वॉटसन बरोबर ८१ धावांची सलामी दिली.

आधी संयमी खेळी आणि नंतर तुफानी अर्धशतक ठोकल्यानंतर शेन वॉटसन माघारी परतला. त्याने ३ चौकार आणि ४ षटकार यांच्या मदतीने ३२ चेंडूत ५० धावा केल्या. पाठोपाठ बाचकत फलंदाजी करणारा सुरेश रैनाही स्वस्तात तंबूत परतला. त्याने केवळ ११ धावा केल्या. विजयासाठी २ धावा आवश्यक असताना धोनीला विजयी षटकार मारण्याचा मोह आवरला. त्यातच तो बाद झाला. अखेर रायडूने विजयी फटका लगावत विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2019 11:58 pm

Web Title: ipl 2019 csk vs dc qualifier 2 dwayne bravo completes 100 wickets in ipl for csk
टॅग IPL 2019
Next Stories
1 IPL 2019 : इतिहासाची पुनरावृत्ती! पुन्हा घडून आला दिल्लीसाठी ‘हा’ दुर्दैवी योगायोग
2 IPL 2019 : चेन्नईचा ‘आठवा’वा प्रताप! केला ‘हा’ पराक्रम
3 IPL 2019 : दिल्लीविरुद्ध हरभजन सिंह चमकला, १५० बळींचा टप्पा पूर्ण
Just Now!
X