IPL 2019 RCB vs CSK : अंतिम चेंडूपर्यंत रंगतदार झालेल्या अटीतटीच्या सामन्यात बंगळुरूच्या संघाने चेन्नईला एका धावेने पराभूत केले. शेवटच्या षटकात आवश्यक असलेल्या २६ धावांचा पाठलाग करताना धोनीने ५ चेंडूत २४ धावा फटकावल्या. पण अखेरच्या चेंडूवर २ धावांची गरज असताना यष्टीरक्षक पार्थिव पटेल याने शार्दूल ठाकूरला चपळाईने बाद केले.

एकीकडे गडी बाद होत असताना कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अत्यंत शांत आणि संयमी खेळी केली. त्याने सुरुवातीला मोक्याच्या क्षणी फटकेबाजी केली, तर भेदक मारा करणारे चेंडू खेळून काढले. पण शेवटच्या टप्प्यात मात्र त्याने आपली लय दाखवून दिला आणि ४८ चेंडूत ८४ धावा केल्या, पण त्याचे प्रयत्न अपुरे पडले. या खेळीमुळे सर्व जण त्याचे पुन्हा एकदा चाहते झाले. यात मॉडेल शिबानी दांडेकर हिने केलेले ट्विट सर्वाधिक चर्चेत राहिले. ‘धोनी म्हणजे नेहमी पाहावंसं वाटणारं स्वप्न आहे’, असं ट्विट तिने केले.

दरम्यान, १६२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या डावाची सुरुवात खराब झाली.आधी वॉटसन ५ धावांवर झेलबाद झाला. पुढच्याच चेंडूवर स्टेनने रैनाचा (०) त्रिफळा उडवला. सलामीवीर फाफ डु प्लेसिस मोठा फटका खेळण्यासाठी सरसावला, पण तो फटका चुकला आणि डु प्लेसिस ५ धावांवर माघारी परतला. डु प्लेसिस सारखाच फटका खेळून केदार जाधवही तंबूत परतला आणि चेन्नईला २८ या धावसंख्येवर चौथा धक्का बसला. केदारने ९ धावा केल्या. धोनीने अप्रतिम फटकेबाजी केली, पण अखेर एका धावेने हा सामना बंगळुरूने जिंकला.

धोनीच्या नावावर सात विराट विक्रम

चार गडी झटपट बाद झाल्यानंतर अंबाती रायडूने धोनीच्या साथीने डाव सावरला, पण विजयासाठी आवश्यक असलेली धावगती गाठण्यासाठी त्याने फटकेबाजीचा पर्याय स्वीकारला. त्यातच २ चौकार आणि १ षटकार लगावून तो २९ धावांवर माघारी परतला. या दोघांनी मिळून ५५ धावांची भागीदारी केली. धोनी आणि रवींद्र जाडेजा यांच्यात भागीदारी होत असतानाच जाडेजा धावचीत झाला आणि चेन्नईला सहावा धक्का बसला. जाडेजाने ११ धावा केल्या. एकीकडे फलंदाज बाद होताना कर्णधार महेंद्रसिंग धोनीने एक बाजू लावून धरली. ३५ चेंडूत त्याने धडाकेबाज अर्धशतक ठोकले. निर्णायक क्षणी ब्राव्हो झेलबाद झाला. त्याने केवळ ५ धावा केल्या.

त्याआधी सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या बंगळुरुच्या फलंदाजांनी निराशा केली. मात्र पार्थिव पटेल आणि मधल्या फळीतल्या फलंदाजांनी संयम राखत फटकेबाजी करुन संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. त्याने ३७ चेंडूत ५३ धावा केल्या. बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीला झटपट माघारी धाडण्यात चेन्नईचे गोलंदाज यशस्वी ठरले. दिपक चहरने कोहलीला माघारी धाडलं. यानंतर एबी डिव्हीलियर्स, अक्षदीप नाथ, स्टॉयनिस यांनी थोड्या-थोड्या कालावधीसाठी पार्थिव पटेलला चांगली साथ दिली. मात्र मोठी खेळी करण्यात ते अपयशी ठरले. चेन्नईकडून दिपक चहर-शार्दुल ठाकूर आणि रविंद्र जाडेजा यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. इम्रान ताहीरने एका फलंदाजाला बाद केलं.