आपल्या गल्लीत सामना रंगात आला असताना जर चेंडू हरवला, तर सगळी लहान मोठी मुलं चेंडू शोधायला लागतात. सामान्यतः झाडाझुडपात चेंडू हरवला की सगळ्यांना प्रयत्नांची शर्थ करून चेंडू शोधावा लागतो. पण भर मैदानात तेही आंतराराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटपटू खेळत असताना अचानक चेंडू गायब झाला तर… फलंदाज हातात बॅट घेऊन तयार.. गोलंदाजही तयार.. पण अशा वेळी समजा चेंडूच सापडला नाही तर…. असाच एक तुफान विनोदी प्रकार बंगळुरू आणि पंजाब यांच्यात बुधवारी झालेल्या सामन्यात घडला.

बंगळुरूच्या डावातील १४ षटकांचा खेळ संपला होता. स्ट्रॅटेजिक टाइम आऊट घेतल्याने खेलाडू थोडेसे विसावले. अडीच मिनिटांच्या कालावधीनंतर सामना पुन्हा सुरु झाला. अंकित राजपूत पंजाबकडून १५ वे षटक घेऊन आला आणि मैदानावर एकच गोंधळ उडाला. अंकित राजपूतने चेंडू मागितला, त्यावर पंचानी पंजाबचा कर्णधार अश्विनकडे पाहिले. अश्विनने आपल्याकडे चेंडू नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर बराच वेळ मैदानावर सर्व खेळाडू चेंडू शोधण्यात व्यस्त होते. अखेर नवा चेंडू मैदानात मागवण्यात आला. त्या दरम्यान ऍक्शन रिप्लेमध्ये १४ वे षटक संपल्यावर चेंडू कुठे गेला याचा शोध घेण्यात आला. त्यावेळी अखेर तो चेंडू मैदानावरील एका पंचांनी आपल्या खिशात ठेवल्याचे दिसून आले. हा व्हिडीओ पाहिल्यावर मैदानावर एकच हशा पिकला आणि पंचानीही हसत हसत चेंडू खिशातून काढून दिला आणि सामन्याला पुढे सुरुवात झाली.

हा पहा व्हिडीओ –

बंगळुरूने पंजाबच्या संघावर १७ धावांनी विजय मिळवत विजयाची हॅटट्रिक साजरी केली. डीव्हिलियर्सच्या धडाकेबाज नाबाद ८२ धावांच्या खेळीच्या जोरावर बंगळुरूने पंजाबला विजयासाठी २०३ धावांचे आव्हान दिले होते. मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचा संघ ७ बाद १८५ धावांपर्यंतच मजल मारू शकला. निकोलस पूरन, ख्रिस गेल, लोकेश राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी छोटेखानी तुफानी खेळी केली, पण या खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकल्या नाहीत. बंगळुरूने हंगामातील चौथा विजय मिळवत प्ले ऑफ्समधील आपले आव्हान कायम ठेवले आहे.

२०३ धावांच्या डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचे सलामीवीर लोकेश राहुल आणि ख्रिस गेल यांनी धमाकेदार सुरुवात केली होती. पण १० चेंडूत २३ धावा ठोकून तो माघारी परतला. त्याने ४ चौकार आणि १ षटकार लगावला. गेल बाद झाल्यावर राहुलने मयंक अग्रवालला साथीला घेऊन तुफान फटकेबाजी सुरु ठेवली आणि ९ षटकात संघाला शतकी मजल मारून दिली. उत्तम जमलेली जोडी फोडण्यात अखेर स्टॉयनीसला यश आले. त्याने मयंक अग्रवालला झेलबाद केले आणि पंजाबला दुसरा धक्का बसला. मयंकने २१ चेंडूत ३५ धावा केल्या. यात ५ चौकार आणि १ षटकार यांचा समावेश होता. फटकेबाजी करणारा लोकेश राहुल २७ चेंडूत ४२ धावांवर माघारी परतला. त्याने या खेळीत ७ चौकार आणि १ षटकार लगावला. संयमी खेळी करणारा डेव्हिड मिलर मोठा फटका खेळताना बाद झाला आणि पंजाबला चौथा धक्का बसला. त्याने २५ चेंडूत २४ धावा केल्या. लगेचच पूरनदेखील बाद झाला. त्यामुळे पंजाबला विजय मिळवणे शक्य झाले नाही.

त्याआधी एबी डिव्हीलियर्सचं आक्रमक नाबाद अर्धशतक (८२*) व त्याला पार्थिव पटेल (४३) आणि मार्कस स्टॉयनिस (४६*) ने दिलेली साथ या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने २०२ धावांपर्यंत मजल मारली आहे. पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम बंगळुरुला फलंदाजीचा संधी दिली. आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत पंजाबच्या गोलंदाजांनी बंगळुरुच्या डावाला सुरुवातीच्या षटकांमध्येच खिंडार पाडलं. पहिल्या विकेटसाठी ३५ धावांची भागीदारी झाल्यानंतर विराट कोहली (१३) मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर झेलबाद होऊन माघारी परतला. यानंतर पार्थिव पटेल आणि एबी डिव्हीलियर्स यांच्यात छोटेखानी भागीदारी झाली. पार्थिवने या दरम्यान फटकेबाजी करत काही चांगले फटके खेळले. मात्र मुरगन आश्विनच्या गोलंदाजीवर तो माघारी परतला. पार्थिवने ४३ धावा केल्या. यानंतर मोईन अली (४) आणि अक्षदीप नाथ (३) ही झटपट माघारी परतले.

संघ संकटात सापडलेला असताना एबी डिव्हीलियर्सने एका बाजूने आक्रमक खेळी करत संघाचा डाव सावरला. अखेरच्या षटकांमध्ये पंजाबच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करत डिव्हीलियर्सने आपलं अर्धशतक साजरं केलं. या फटकेबाजीमुळे काही क्षणांपूर्वी संकटात सापडलेला बंगळुरुचा संघ चांगलाच स्थिरावला. डिव्हीलियर्स आणि स्टॉयनिस यांच्यात पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी झाली. मोहम्मद शमीच्या १९ व्या षटकात दोन्ही फलंदाजांनी चौफेर फटकेबाजी केली. हा सामना जिंकण्यासाठी पंजाबला २०३ धावांचं आव्हान देण्यात आलं आहे. पंजाबकडून अंकित राजपूतचा अपवाद वगळता चारही गोलंदाजांना प्रत्येकी १-१ बळी मिळाला.