IPL 2019 RCB vs SRH : बंगळुरूच्या मैदानावर बंगळुरू आणि हैदराबाद यांच्यात सामना सुरू आहे. कर्णधार केन विल्यमसनच्या संयमी खेळीच्या जोरावर सनरायजर्स हैदराबाद संघाने १७५ धावांपर्यंत मजल मारली आणि बंगळुरूला १७६ धावांचे आव्हान दिले.

नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करणाऱ्या बंगळुरुच्या गोलंदाजांनी हैदराबादच्या धावगतीवर चांगलाच अंकुश लावला. वृद्धीमान साहा (२०) आणि मार्टीन गप्टील (३०) जोडीने पहिल्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र साहा माघारी परतल्यानंतर हैदराबादचे फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतत राहिले.

मुंबईविरुद्धच्या सामन्यात अप्रतिम फलंदाजी करणाऱ्या मनीष पांडेला या सामन्यात फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. पण तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला. मनीष पांडे १ धावेवर खेळत असताना युझवेन्द्र चहलने चेंडू टाकला. तो चेंडू त्याच्या पायाला आणि बॅटला लागून थेट स्टंपला लागणार होता, पण त्याचे नशीब बलवत्तर त्यामुळे चेंडू स्टंपच्या अगदी सूतभर बाजूने गेला. ही घटना पाहून विराट कोहलीदेखील अवाक झाला.

हा पहा व्हिडीओ –

त्यानंतर मात्र तो ९ धावा करून बाद झाला. तो बाद झाल्यावर चौथ्या विकेटसाठी केन विल्यमसन आणि विजय शंकर यांच्यात छोटेखानी भागीदारी झाली. शंकर (२७) माघारी परतल्यानंतर हैदराबादच्या डावाला पुन्हा गळती लागली. एकीकडे फलंदाज माघारी परतत असताना कर्णधार केन विल्यमसनने संयमी खेळी करत अर्धशतक झळकावलं. त्याने नाबाद ७० धावा केल्या.

बंगळुरुकडून वॉशिंग्टन सुंदरने ३, नवदीप सैनीने २ तर युजवेंद्र चहल आणि कुलवंत खेजरोलिया यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. त्यामुळे बंगळुरुला हरवत हैदराबाद बाद फेरी गाठतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.