IPL 2019 KKR vs DC : घरच्या मैदानावर कोलकाताचा दिल्लीकडून ७ गडी राखून मोठा पराभव झाला. सलामीवीर शिखर धवनच्या नाबाद ९७ धावांच्या खेळीच्या जोरावर दिल्लीने १७९ धावांचे आव्हान ७ चेंडू राखून पूर्ण केले. कोलकाताने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ७ बाद १७८ धावा केल्या होत्या. मात्र त्यांच्या गोलंदाजांना या धावसंख्येचा बचाव करता आला नाही. पण या सामन्यात सलामीवीर म्हणून आलेला शुभमन गिल छान कामगिरी करून गेला.

गिलने ३९ चेंडूत दमदार ६५ धावा केल्या. यात ७ चौकार आणि २ षटकार समाविष्ट होते. त्याच्याबाबत बोलताना कार्तिकने त्याची प्रशंसा केली. ”आमच्या संघासाठी ही खूपच रोचक वेळ आहे. ख्रिस लिन आमच्या संघासाठी सलामीवीर म्हणून खेळतो आणि चांगल्या धावा करतो. सुनील नरिनदेखील जेव्हा संधी मिळेल तेव्हा चांगली सुरुवात देण्यास मदत करतो. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात शुभमन गिलला सलामीवीर म्हणून खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने उत्तम फलंदाजी करून दाखवली.” अशा शब्दात कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिक याने शुभमनची स्तुती केली.

फलंदाजी करताना शुभमनने त्याच्या खेळीचा दर्जा दाखवून दिला. आम्ही त्याला सातव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची जबाबदारी दिली होती. त्याच्या स्वभावाला धरूनच त्याला ही भूमिका सोपवण्यात आली होती. कारण तो दडपणाच्या काळात अतिशय शांत आणि संयमी खेळी करतो. हा त्याच्यातील एक उत्तम आणि वाखाणण्याजोगा गुण आहे. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात त्याला सलामीला पाठवण्यात आले. तेव्हादेखील त्याने उत्तम कामगिरी केली. त्याला आता ही बाब समजली आहे की जर संधी मिळाली तर त्याला वरच्या फळीतही फलंदाजीची संधी देता येऊ शकते. जर संधी नसेल, तर तो तसाही सातव्या क्रमांकावर खेळण्यास तयार आहेच, असे कार्तिकने स्पष्ट केले.

दरम्यान, १७९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर पृथ्वी शॉ झेलबाद झाला आणि दिल्लीला पहिला धक्का बसला. पृथ्वीने १४ धावा केल्या. त्यात २ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. कर्णधार श्रेयस अय्यरने चाहत्यांचा अपेक्षाभंग केला. केवळ ६ धावा करून तो माघारी परतला आणि दिल्लीला दुसरा धक्का बसला. शिखर धवनच्या साथीने खेळत ऋषभ पंतने दमदार फटकेबाजी केली. पण अर्धशतकाने त्याला हुलकावणी दिली. तो ४६ धावा करून बाद झाला. पण शिखर धवन ९७ धावा करून नाबाद राहिला. तर कॉलिन इन्ग्रॅमने (१४*) विजयी षटकार लगावला.

त्या आधी, कोलकाताकडून सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळालेला जो डेण्टली पहिल्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. इशांत शर्माने उत्कृष्ट स्विंग गोलंदाजी करत त्याला माघारी धाडले. किमो पॉल याच्या गोलंदाजीवर मिळालेल्या ‘फ्री हिट’वर षटकार लगावत कोलकाताने अर्धशतकी मजल मारली. रॉबिन उथप्पाने अचूक फटका खेळत ‘फ्री हिट’चा उपयोग केला. धडाकेबाज सुरुवात मिळालेला रॉबिन उथप्पा उसळत्या चेंडूवर फटका लगावताना झेलबाद झाला. यष्टिरक्षकाने उंच उडी मारून त्याचा अप्रतिम झेल टिपला. उथप्पाने ४ चौकार आणि १ षटकार लगावत ३० चेंडूत २८ धावा केल्या. शुभमन गिल याने अप्रतिम खेळी साकारत दमदार अर्धशतक झळकावले. पण कोलकाताच्या संघाला तो आनंद फार काळ साजरा करता आला नाही. कारण त्यानंतरच्या षटकातच नितीश राणा त्रिफळाचीत झाला आणि कोलकाताचा तिसरा गडी माघारी परतला. राणाने १२ चेंडूत ११ धावा केल्या.

अर्धशतक पूर्ण केल्यावर फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात शुभमन गिल झेलबाद झाला आणि कोलकाताला चौथा धक्का बसला. गिलने ३९ चेंडूत दमदार ६५ धावा केल्या. यात ७ चौकार आणि २ षटकार समाविष्ट होते. कर्णधार दिनेश कार्तिक २ धावांवर बाद झाला आणि कोलकाताला पाचवा धक्का बसला. आंद्रे रसलने नेहमीप्रमाणे फटकेबाजी करत ४५ धावा केल्या. यात ३ चौकार आणि २ षटकार खेचले. क्रेग ब्रेथवेट ६ धावांवर बाद झाला.शेवटच्या टप्प्यात पियुष चावलाच्या ६ चेंडूत १४ धावांच्या जोरावर कोलकाताने १७८ धावांपर्यंत मजल मारली.