आयपीएलच्या बाराव्या हंगामाच चेन्नईपाठोपाठ सनराईजर्स हैदराबाद संघाने आपला चांगला फॉर्म कायम राखला आहे. दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर झालेल्या सामन्यात हैदराबादने 5 गडी राखून सामन्यात विजय मिळवला. दिल्लीने दिलेल्या 130 धावांचा पाठलाग करताना हैदराबाद संघाचा डाव मधल्या षटकात कोलमडला. मात्र मोहम्मद नबीने फटकेबाजी करत हैदराबादच्या संघावर शिक्कामोर्तब केलं. याव्यतिरीक्त नबीने दिल्लीच्या 2 फलंदाजांना माघारीही धाडलं.

या खेळीसह नबीने आपल्या नावावर असलेला अनोखा विक्रम कायम ठेवला आहे. सनराईजर्स हैदराबाद संघाकडून मोहम्मद नबीने सात सामने खेळले आहेत. या सातही सामन्यांमध्ये हैदराबादने विजय मिळवला आहे. अशाप्रकारे 100 टक्के कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत नबी सध्या पहिल्या स्थानावर आहे. चेन्नईकडून 2008 साली पलानी अमरनाथ या खेळाडूच्या नावावर आतापर्यंत 6 विजयांचा विक्रम जमा आहे.

१३० धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने तडाखेबाज सुरुवात केली आणि केवळ ३२ चेंडूत अर्धशतकी सलामी दिली. बेअरस्टोने धमाकेदार सुरुवात केली. पण तडाखेबाज खेळी करणाऱ्या बेअरस्टोला अर्धशतकाने हुलकावणी दिली आणि अखेर हैदराबादला पहिला धक्का बसला. त्याने २८ चेंडूत ४८ धावा केल्या. त्यात ९ चौकार आणि १ षटकार समाविष्ट होता. फटकेबाजीच्या प्रयत्नात डेव्हिड वॉर्नर झेलबाद झाला आणि हैदराबादला दुसरा धक्का बसला. त्याने १८ चेंडूत १० धावा केल्या. बेअरस्टो-वॉर्नर बाद झाल्यावर मनीष पांडे आणि विजय शंकर दोघांनी डाव सावरला. पण उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. त्याने १३ चेंडूत १० धावा केल्या. मनीष पांडे बाद झाल्यावर पाठोपाठ विजय शंकरदेखील झेलबाद झाला आणि हैदराबादला चौथा धक्का बसला. विजयने २१ चेंडूत १६ धावा केल्या. दीपक हुडाने फिरकीपटूला षटकार मारण्याचा प्रयत्न केला, पण तो झेलबाद झाला. त्याने ११ चेंडूत १० धावा केल्या. अखेर मोहम्मद नबी आणि युसूफ पठाण यांनी हैदराबादला विजय मिळवून दिला.