बाद फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी बेंगळूरुशी आज सामना

बेंगळूरु : सुरुवातीच्या आठ सामन्यांपैकी चार सामने जिंकूनसुद्धा सनरायजर्स हैदराबादला इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये अद्याप बाद फेरी गाठता आलेले नाही. त्यामुळे शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुविरुद्ध होणाऱ्या सामन्यात त्यांना विजय मिळवणे अनिवार्य आहे. अन्यथा बाद फेरीत स्थान मिळवण्यासाठी त्यांना इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहावे लागेल.

गुरुवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध हैदराबादला ‘सुपर ओव्हर’मध्ये पराभव पत्करावा लागला. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांची अनुपस्थिती त्यांना प्रकर्षांने जाणवली. त्याशिवाय गेल्या चार लढतींमध्ये तीन अर्धशतके झळकावणाऱ्या मनीष पांडेला इतर फलंदाजांची साथ न लाभल्यामुळे हैदराबादला विजयाने हुलकावणी दिली. बाद फेरीतील पहिले तीन संघ निश्चित झाले असल्यामुळे चौथ्या स्थानासाठी हैदराबादलाच सर्वाधिक संधी आहे. त्यासाठी फलंदाजांनी कामगिरी सुधारण्याची आवश्यकता आहे. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार, खलिल अहमद आणि फिरकीपटू रशीद खान हे प्रभावी मारा करत आहेत.

दुसरीकडे, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या बेंगळूरुचा संघ प्रतिष्ठा जपण्यासाठी मैदानात उतरणार असून विश्वचषकापूर्वी चाहत्यांना तुफानी फटकेबाजीचा नजराणा पेश करण्यासाठी कोहली उत्सुक असेल.

* सामन्याची वेळ : रात्री ८ वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स हिंदी १

बाद फेरीचे समीकरण

* १३ सामन्यांतून सहा विजयांसह हैदराबादचा संघ तूर्तास गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर असून इतर सर्व संघांच्या तुलनेत त्यांची निव्वळ धावगती (+०.६५३) अधिक सरस आहे. त्यामुळे हैदराबादने फक्त हा सामना जिंकण्याची आवश्यकता असून, कोलकाता व पंजाब यांच्यापैकी कोणीही उर्वरित सामने मोठय़ा फरकाने सामना जिंकू नये, यासाठी त्यांना साकडे घालावे लागणार आहे.

* हैदराबादने विजय मिळवल्यास राजस्थानचेही (११ गुण) आव्हान संपुष्टात येईल.

* हैदराबादने हा सामना गमावला आणि कोलकाता व पंजाब यांनी उर्वरित दोन सामन्यांतून फक्त एकच सामना जिंकला तरी हैदराबादला सरस धावगतीच्या बळावर बाद फेरी गाठता येईल.