आयपीएलच्या आगामी हंगामासाठी सर्व संघ सज्ज झालेले आहेत. आयपीएलच्या इतिहासात सर्वात यशस्वी संघांपैकी एक संघ म्हणून ओळख असलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज आगामी हंगामात आपल्या प्रमुख खेळाडूंना डच्चू देण्याच्या तयारीत आहे. My Khel या संकेतस्थळाने दिलेल्या बातमीनुसार चेन्नईचा संघ केदार जाधव, अंबाती रायुडू आणि मुरली विजय या खेळाडूंना संघातून मोकळं करणार असल्याचं कळतंय.

मुरली विजयला गेल्या हंगामात फारशी संधी मिळालेली नव्हती

 

प्रत्येक हंगामाच्या अखेरीस संघमालकांना काही खेळाडूंना आपल्या संघातून मोकळं करावं लागतं. त्यामुळे चेन्नईने आगामी हंगामासाठी केदार जाधव, अंबाती रायुडू आणि मुरली विजय यांना लिलावाच्या प्रक्रियेमधून जावं लागण्याची शक्यता आहे. प्रत्येक संघमालकांना १४ नोव्हेंबरपर्यंत आपल्या संघातून करारमुक्त करणाऱ्या खेळाडूंची यादी सोपवायची आहे.

शार्दुल ठाकूरने गेल्या हंगामात बऱ्याच धावा मोजल्यामुळे यंदा चेन्नई नवीन गोलंदाजांच्या शोधात आहे

 

३ फलंदाजांसोबत चेन्नई सुपरकिंग्ज शार्दुल ठाकूर आणि कर्ण शर्मा यांनाही लिलावाला सामोरं जावं लागण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. १९ डिसेंबरला कोलकात्यात आयपीएलच्या आगामी हंगामाचा लिलाव पार पडेल, ज्यात चेन्नई सुपरकिंग्ज कोणत्या खेळाडूंवर बोली लावतेय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.