ऑक्टोबर महिन्यात टी-२० विश्वचषकाच्या आयोजनाची शक्यता दिवसेंदिवस कमी होत जात असताना, क्रिकेट ऑस्ट्रेलिया बोर्डानेही आपल्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याबाबत विचार करुन तयारी सुरु करा असं सांगितलं आहे. स्पर्धा रद्द झाल्यास ४ हजार कोटींचं नुकसान होणार असल्यामुळे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी यंदाची आयपीएल स्पर्धा खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबर-नोव्हेंबर या कालावधीत आयपीएलचा तेरावा हंगाम आयोजित करण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. आयसीसीने अद्याप टी-२० विश्वचषकाच्या आयोजनाबद्दल निर्णय घेतलेला नसला, तरीही ही स्पर्धा रद्द होण्याचे संकेतच आहेत. त्यामुळे विश्वचषक रद्द झाल्यास बीसीसीआयला आयपीएलचा तेरावा हंगाम खेळवण्याची संधी मिळणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या खेळाडूंना आयपीएलची तयारी करायला सांगितलं आहे. ही स्पर्धा जिथे खेळवली जाईल तिकडे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू सहभाही होतील असं समजतंय. बीसीसीआय आयपीएलचा तेरावा हंगाम भारतामध्येच आयोजित करण्याच्या प्रयत्नात आहे. परंतू परिस्थिती नियंत्रणात न आल्यास श्रीलंका आणि UAE क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला आयपीएलच्या आयोजनाचा प्रस्ताव दिला आहे. काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडनेही आयोजनाचा प्रस्ताव दिल्याचं बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. परंतू न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने असा कोणताही प्रस्ताव पाठवला नसल्याचं स्पष्ट केलं.

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही आयपीएलच्या तेराव्या हंगामाच्या आयोजनाबद्दल सकारात्मकता दाखवली होती. “हे वर्ष आयपीएलशिवाय संपू नये अशी आमची इच्छा आहे. स्पर्धेच्या आयोजनासाठी भारत हीच आमची पहिली पसंती असणार आहे. ३५-४० दिवसांमध्ये आयोजन करता येणं शक्य असणार असेल तरीही स्पर्धेचं आयोजन होईल. भारताबाहेर स्पर्धेचं आयोजन हा देखील एक पर्याय आहे, मात्र यामुळे खर्च वाढणार आहे. सर्वात प्रथम ठरवलेल्या वेळेत स्पर्धेचं आयोजन करता येईल की नाही हे आम्ही पाहणार आहोत, आणि भारतात आयोजन शक्य नसेल तरच मग परदेशी आयोजनाचा विचार होईल. यासाठी सर्व आर्थिक गोष्टींचा विचार करावा लागणार आहे.” गांगुली India Today च्या Inspiration या कार्यक्रमात बोलत होता.