News Flash

KKR vs PBKS : कोलकाताची पंजाबवर मात, मॉर्गनची चिवट खेळी

कोलकाताच्या १६.४ षटकात ५ बाद १२६ धावा

कोलकाता वि. पंजाब

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएलच्या १४व्या पर्वाचा पहिला सामना पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात कोलकाताने ५ गडी राखून पंजाबवर विजय मिळवला. नाणेफेक जिंकलेल्या कोलकाताने पंजाबला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. प्रसिध कृष्णा, पॅट कमिन्स आणि सुनील नरिन यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे पंजाबला २० षटकात ९ बाद १२३ धावा करता आल्या. प्रत्युत्तरात कोलकाताने आपले पाच गडी गमावले, पण कर्णधार ईऑन मॉर्गनच्या चिवट खेळीमुळे त्यांना १७व्या षटकात विजय मिळवता आला. मॉर्गनने ४ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ४७ धावांची खेळी केली.

कोलकाताचा डाव

पंजाबच्या छोट्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्याच षटकात मोझेस हेन्रिक्सने नितीश राणाला शून्यावर बाद केले. पुढच्याच षटकात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने शुबमन गिलला पायचित पकडले. गिल पुन्हा अपयशी ठरला, त्याला ९ धावा केल्या. मैदानात आलेला सुनील नरिन तिसऱ्या षटकात माघारी परतला. अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर त्याच्या रवी बिश्नोईने सुंदर झेल टिपला. नरिनला भोपळाही फोडता आला नाही. पहिल्या पॉवरप्लेपर्यंत कोलकाताला ३ बाद ४२ धावा करता आल्या. त्यानंतर कर्णधार ईऑन मॉर्गन आणि राहुल त्रिपाठीने संघाला सावरले. या दोघांनी ३५ चेंडूत अर्धशतकी भागीदारी केली. ११व्या षटकात आपल्या अर्धशतकाकडे वाटचाल करणाऱ्या राहुल त्रिपाठीला दीपक हुडाने माघारी धाडले. त्रिपाठीने ७ चौकरांसह ४१ धावा केल्या. त्यानंतर मैदानात आलेला आंद्रे रसेलही अपयशी ठरला. १५व्या षटकात तो धावबाद झाला. रसेलला १० धावा करता आल्या. रसेलनंतर मैदानात आलेल्या दिनेश कार्तिकने १७व्या षटकात चौकार खेचत विजयावर शिक्कामोर्तब केले.

पंजाबचा डाव

पंजाबकडून कर्णधार केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी डावाची सुरुवात केली. ५ षटकात पंजाबने २९ धावा फलकावर लावल्या. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात राहुल माघारी परतला. त्याला पॅट कमिन्सने झेलबाद केले. राहुलला १९ धावा करता आल्या. पॉवरप्लेमध्ये पंजाबने ६ षटकात १ बाद ३७ धावा केल्या. राहुलनंतर आलेले ख्रिस गेल आणि दीपक हुडा हे दोघेही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. शिवम मावीने गेलला शून्यावर, तर प्रसिध कृष्णाने हुडाला एका धावेवर माघारी धाडले. त्यानंतर मयंक आणि निकोलस पूरन यांनी पंजाबचे अर्धशतक पूर्ण केले. खेळपट्टीवर स्थिरावलेल्या मंयकला नरिनने राहुल त्रिपाठीकरवी झेलबाद केले.  मयंकने ३१ धावांचे योगदान दिले. मयंकनंतर आलेला मोझेस हेन्रिक्सही काही खास करू शकला नाही. नरिनचा तो दुसरा बळी ठरला.

वरुण चक्रवर्तीने १५व्या षटकात पंजाबला अजून एक धक्का दिला. चक्रवर्तीने निकोलस पूरनची दांडी गुल केली. पूरनला १९ धावा करता आल्या. शंभर धावांच्या आत पंजाबने शाहरुख खानलाही गमावले. प्रसिध कृष्णाने  शाहरुखला वैयक्तिक १३ धावांवर बाद केले. पंजाबने १९व्या षटकात शतक पूर्ण केले. शेवटच्या षटकात ख्रिस जॉर्डनने केलेल्या फटकेबाजीमुळे पंजाबला १२० धावा ओलांडता आल्या. जॉर्डनने १८ चेंडूत १ चौकार आणि ३ षटकारांसह ३०धावा केल्या. कोलकाताकडून प्रसिध कृष्णाने सर्वाधिक ३ बळी घेतले. सुनील नरिन आणि कमिन्सला प्रत्येकी २ बळी मिळाले.

यंदा कोलकाताची कामगिरी आतापर्यंत खूपच खराब झाली असून त्यांनी ५ पैकी ४ सामने गमावले आहेत. दुसरीकडे पंजाबची कामगिरीही फारशी चांगली झालेली नाही. त्यांनी ५ पैकी केवळ २ सामने जिंकले आहेत. गुणतालिकेत कोलकाताचा संघ सर्वात खाली आहे. तर, पंजाब पाचव्या स्थानी आहे. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात एकूण २७ सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी कोलकाताने १८ तर, पंजाब किंग्जने केवळ ९ सामने जिंकले आहेत.

प्लेईंग XI

कोलकाता – शुबमन गिल, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, ईऑन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), आंद्रे रसेल, सुनील नरिन, पॅट कमिन्स, वरुण चक्रवर्ती, शिवम मावी आणि प्रसिध कृष्णा.

पंजाब – केएल राहुल (कर्णधार आणि यष्टीरक्षक), मयंक अग्रवाल, ख्रिस गेल, निकोलस पूरन, दीपक हुडा, मोझेस हेनरिक्स, शाहरुख खान, ख्रिस जॉर्डन, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह आणि मोहम्मद शमी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2021 7:03 pm

Web Title: ipl 2021 kkr vs pbks match report adn 96
टॅग : IPL 2021
Next Stories
1 ‘या’ आठ गोलंदाजांची आयपीएलमध्ये सर्वाधिक धुलाई
2 गंभीर म्हणतो, ‘मागील १२ वर्षातील KKRची “ही” सर्वात मोठी चूक’
3 जिंकलंस भावा… ऑक्सिजन पुरवठ्यासाठी ऑस्ट्रेलियन खेळाडूने PM Cares निधीला दिले ३७ लाख रुपये
Just Now!
X