फिरकीपटू अमित मिश्राने केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सवर 6 गडी राखून विजय मिळवला. चेन्नईच्या चेपॉक मैदानावर रंगलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सचे स्टार फलंदाज मोठी कामगिरी करण्यात अपयशी ठरले. फिरकीला मदत करणाऱ्या या खेळपट्टीवर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने 20 षटकात 9 बाद 137 धावा उभारल्या. रोहितव्यतिरिक्त (44) मुंबईच्या इतर फलंदाजांनी निराशा केली. आज दिल्ली संघात संधी मिळालेल्या अनुभवी अमित मिश्राने 4 षटकात 24 धावा देत 4 बळी घेतले. मुंबईच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने केवळ 4 गडी गमावले. तब्बल 11 वर्षानंतर दिल्लीने या मैदानावर विजय साकारला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्लीचा डाव

मुंबईच्या छोटेखानी आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खराब झाली. फिरकीपटू जयंत यादवने दिल्लीचा मुंबईकर फलंदाज पृथ्वी शॉला दुसऱ्याच षटकात माघारी पाठवले. त्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि शिखर धवन संघासाठी उभे राहिले. पहिल्या 6 षटकांच्या पॉवरप्लेमध्ये दिल्ली कॅपिटल्सने 1 बाद 39 धावा केल्या. 9व्या षटकात स्मिथ आणि धवनने अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. त्यानंतर कायरन पोलार्डने मुंबईला दुसरे यश मिळवून दिले. त्याने स्टीव्ह स्मिथला वैयक्तिक 33 धावांवर पायचित पकडले. सुसाट फॉर्मात असलेला धवन संघाला विजय मिळवून देईल असे वाटत होते, पण 15व्या षटकात दिल्लीने धवनला गमावले. मुंबईचा फिरकीपटू राहुल चहरने त्याला कृणालकरवी झेलबाद केले. धवनने 5 चौकार आणि एका षटकारासह 45 धावांची खेळी केली. धवननंतर पंतही स्वस्तात माघारी परतला, पण शिमरोन हेटमायर आणि ललित यादव यांनी दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दिल्लीने 19.1 षटकात 4 गडी गमावत हे आव्हान गाठले.

मुंबईचा डाव

रोहित शर्मा आणि क्विंटन डि कॉक यांनी मुंबईच्या डावाची सुरुवात केली. तिसऱ्या षटकात दिल्लीचा गोलंदाज मार्कस स्टॉइनिसने क्विंटन डि कॉकला बाद करत मुंबईला पहिला धक्का दिला. डि कॉकने 2 धावा केल्या. त्यानंतर रोहितने सूर्यकुमारला हाताशी घेत पहिल्या पॉवरप्लेमध्ये मुंबईसाठी 1 बाद 55 धावा केल्या. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केल्यानंतर आवेश खानने दिल्लीला यश मिळवून दिले. चांगल्या फॉर्मात खेळणाऱ्या सूर्यकुमारला मुंबईने 7व्या षटकात गमावले. सूर्यकुमारने 24 धावा केल्या. त्यानंतर अर्धशतकाकडे वाटचाल करणाऱ्या रोहितला अमित मिश्राने आपल्या जाळ्यात अडकवले. मोठा फटका खेळण्याच्या नादात रोहित स्मिथकडे झेल देऊन बसला. त्याने 3 षटकार आणि 3 चौकारांसह 44 धावा केल्या.

रोहित बाद झाल्यानंतर मुंबईचा डाव गडगडला. मिश्राने हार्दिक पंड्याला शून्यावर बाद केले. हार्दिकनंतर कृणाल पंड्याही स्वस्तात बाद झाला. त्याला ललित यादवने बाद केले. त्यानंतर आलेल्या कायरन पोलार्डला मिश्राने आपल्या गुगलीत अडकवले. या पडझडीनंतर ईशान किशन आणि जयंत यादवने छोटेखानी भागीदारी उभारली. किशनने 26 तर यादवने 23 धावा केल्या. मिश्राव्यतिरिक्त आवेश खानने 15 धावा देत 2 बळी टिपले.

प्लेईंग XI

दिल्ली कॅपिटल्स – शिखर धवन, पृथ्वी शॉ, स्टीव्हन स्मिथ, ऋषभ पंत (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, ललित यादव, शिमरोन हेटमायर, आर. अश्विन, कगिसो रबाडा, आवेश खान, अमित मिश्रा.

मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डि कॉक, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड, कृणाल पंड्या, राहुल चहर, जयंत यादव, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट.

Live Blog

Highlights

    23:50 (IST)20 Apr 2021
    दिल्लीचा मुंबईवर 6 गडी राखून विजय

    शिमरोन हेटमायर आणि ललित यादव यांनी दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दिल्लीने 19.1 षटकात 4 गडी गमावत हे आव्हान गाठले.

    23:22 (IST)20 Apr 2021
    शेवटच्या षटकात दिल्लीला 5 धावांची गरज

    शेवटच्या षटकात दिल्लीला 5 धावांची गरज आहे. दिल्लीकडून शिमरोन हेटमायर आणि ललित यादव खेळत आहेत.

    23:07 (IST)20 Apr 2021
    दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत माघारी

    मुंबईचा यशस्वी गोलंदाज जसप्रीत बुमराहने 17व्या षटकाच्या शेवटी दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतला (7) माघारी धाडले. 

    22:56 (IST)20 Apr 2021
    दिल्लीचा गब्बर माघारी

    15व्या षटकात दिल्लीने शिखर धवनला गमावले. मुंबईचा फिरकीपटू राहुल चहरने त्याला कृणालकरवी झेलबाद केले. धवनने 5 चौकार आणि एका षटकारासह 45 धावांची खेळी केली. 15 षटकात दिल्लीने 3 बाद 101 धावा फलकावर लावल्या.

    22:48 (IST)20 Apr 2021
    दिल्लीला 36 चेंडूत 48 धावांची गरज

    14 षटकात दिल्लीने 2 बाद 90 अशी मजल मारली आहे. दिल्लीला अजून 36 चेंडूत 48 धावांची गरज असून खेळपट्टीवर शिखर धवन 35 तर ललित यादव 10 धावांवर खेळत आहेत.

    22:24 (IST)20 Apr 2021
    दिल्लीचा दुसरा फलंदाज बाद

    कायरन पोलार्डने मुंबईला दुसरे यश मिळवून दिले. त्याने स्टीव्ह स्मिथला वैयक्तिक 33 धावांवर पायचित पकडले. 10 षटकात दिल्लीने 2 बाद 68 धावा केल्या.

    22:16 (IST)20 Apr 2021
    स्मिथ-धवनची अर्धशतकी भागीदारी

    9व्या षटकात स्मिथ आणि धवनने अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. 9 षटकात दिल्लीने 1 बाद 64 धावा उभारल्या. स्मिथ 33 तर धवन 20 धावांवर खेळत आहे. 

    22:03 (IST)20 Apr 2021
    पॉवरप्लेमध्ये दिल्लीच्या 1 बाद 39 धावा

    पहिल्या 6 षटकांच्या पॉवरप्लेमध्ये दिल्ली कॅपिटल्सने 1 बाद 39 धावा केल्या आहेत. स्टीव्ह स्मिथ 17 तर शिखर धवन 12 धावांवर खेळत आहे.

    21:41 (IST)20 Apr 2021
    दिल्लीला पहिला धक्का

    दुसऱ्याच षटकात दिल्लीने मुंबईकर पृथ्वी शॉला गमावले. फिरकीपटू जयंत यादवने त्याच्या स्वत: च्या गोलंदजीवर झेल घेतला. पृथ्वीने 7 धावा केल्या.

    21:37 (IST)20 Apr 2021
    दिल्लीच्या फलंदाजीला सुरुवात

    शिखर धवन आणि पृथ्वी शॉ ही दिल्लीची सलामी जोडी मैदानात. ट्रेंट बोल्टने मुंबईसाठी टाकलेल्या पहिल्या षटकात दिल्लीच्या बिनबाद 5 धावा.

    21:21 (IST)20 Apr 2021
    मुंबईच्या 20 षटकात 9 बाद 137 धावा

    शेवटच्या दोन षटकात मुंबईने जयंत यादव आणि राहुल चहरला गमावले. 20व्या षटकात मुंबईला 7 धावा घेता आल्या. अमित मिश्राने 4 षटकात 24 धावा देत 4 बळी घेतले.

    21:05 (IST)20 Apr 2021
    मुंबईचा सातवा फलंदाजही माघारी

    मुंबईसाठी जयंत यादवसोबत महत्त्वपूर्ण भागीदारी करणाऱ्या ईशान किशनला अमित मिश्राने आपल्या चौथ्या षटकात माघारी धाडले. किशन मिश्राचा चौथा बळी ठरला. किशनने 26 धावांचे योगदान दिले. 18 षटकात मुंबईने 7 बाद 125 धावा केल्या.

    20:49 (IST)20 Apr 2021
    मुंबईचे शतक पूर्ण

    15व्या षटकात मुंबईने आपले शतक पूर्ण केले. जयंत यादव 9 तर ईशान किशन 14 धावांवर नाबाद आहेत.

    20:34 (IST)20 Apr 2021
    अमित मिश्राचा तिसरा बळी

    अमित मिश्राने आपली फिरकी अधिक मजबूत करत मुंबईला संकटात टाकले. त्याने आपल्या तिसऱ्या षटकात मुंबईच्या कायरन पोलार्डला पायचित पकडले. पोलार्डला फक्त 2 धावा करता आल्या. 12 षटकात मुंबईने 6 बाद 84 धावा केल्या.

    20:27 (IST)20 Apr 2021
    हार्दिकनंतर कृणालही अपयशी

    हार्दिकपाठोपाठ त्याचा भाऊ कृणाल पंड्याही अपयशी ठरला. ललित यादवने त्याला वैयक्तिक एका धावेवर तंबूत धाडले. 10.4 षटकात मुंबईने 5 बाद 81 धावा केल्या.

    20:20 (IST)20 Apr 2021
    हार्दिक पंड्या शून्यावर माघारी

    अमित मिश्राने रोहितनंतर हार्दिकलाही माघारी धाडले. हार्दिकला भोपळाही फोडता आला नाही. 

    20:18 (IST)20 Apr 2021
    रोहित शर्माला अर्धशतकाची हुलकावणी

    अर्धशतकाकडे वाटचाल करणाऱ्या रोहितला अमित मिश्राने आपल्या जाळ्यात अडकवले. मोठा फटका खेळण्याच्या नादात रोहित स्मिथकडे झेल देऊन बसला. त्याने 3 षटकार आणि 3 चौकारांसह 44 धावा केल्या.

    20:10 (IST)20 Apr 2021
    मुंबईला दुसरा धक्का, सूर्यकुमार यादव बाद

    सातव्या षटकात मुंबईने सूर्यकुमारला गमावले. आवेश खानने त्याला यष्टीपाठी झेलबाद केले. सूर्यकुमारने 24 धावा केल्या.

    20:02 (IST)20 Apr 2021
    मुंबईचे अर्धशतक पूर्ण

    पहिल्या पॉवरप्लेमध्ये मुंबईने 1 बाद 55 धावा केल्या. कर्णधार रोहित 29 तर सूर्यकुमार 23 धावांवर खेळत आहे. 

    19:54 (IST)20 Apr 2021
    4 षटकात मुंबईच्या 1 बाद 31 धावा

    पहिली विकेट पडल्यानंतर मुंबईने 4 षटकात 31 धावा केल्या. रोहित 21 तर सूर्यकुमार 7 धावांवर नाबाद आहे.

    19:44 (IST)20 Apr 2021
    मुंबईला पहिला धक्का, डि कॉक बाद

    तिसऱ्या षटकात स्टॉइनिसने क्विंटन डि कॉकला बाद करत मुंबईला पहिला धक्का दिला. डि कॉकने 2 धावा केल्या. 

    19:36 (IST)20 Apr 2021
    मुंबईच्या फलंदाजीला सुरुवात

    रोहित शर्मा आणि क्विंटन डि कॉक यांनी मुंबईच्या डावाची सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या षटकात मुंबईला बिनबाद 6 धावा करून दिल्या. मार्कस स्टॉइनिसने दिल्लीसाठी पहिले षटक टाकले.

    19:09 (IST)20 Apr 2021
    कोण आत कोण बाहेर?

    मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने आज वेगवान गोलंदाज अॅडम मिल्नेला संघाबाहेर बसवले असून फिरकीपटू जयंत यादवला संघात स्थान दिले आहे. दिल्लीने शिमरोन हेटमायर आणि अमित मिश्रा यांना संधी दिली असून ख्रिस वोक्स आणि मेरीवाला यांना विश्रांती दिली आहे.

    मराठीतील सर्व आयपीएल २०२१ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
    Web Title: Ipl 2021 mi vs dc live match updates adn
    First published on: 20-04-2021 at 19:03 IST