जोस बटलरची शतकी खेळी त्यानंतर ख्रिस मॉरिस आणि मुस्तफिजुर रहमानची भेदक गोलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादचा ५५ धावांची पराभव केला. लीगमधील हा हैदराबादचा सहावा पराभव ठरला. नाणेफेक जिंकलेल्या केन विल्यमसनने प्रथम राजस्थानला फलंदाजीचे आमंत्रण दिले. या आमंत्रणाचा स्विकार करत राजस्थानने २० षटकात ३ गडी गमावत २२० धावा फलकावर लावल्या. राजस्थानचा सलामीवीर फलंदाज जोस बटलरने आयपीएलमधील पहिले शतक ठोकत हैदराबादच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. अवघ्या ५६ चेंडूत बटलरने शतक साकारले. प्रत्युत्तरात हैदराबादचा संघ २० षटकात ८ बाद १६८ धावांपर्यंतच मजल मारू शकला. बटलरला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

 

हैदराबादचा डाव

राजस्थानच्या २२१ धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने दमदार सुरुवात केली. मनीष पांडे आणि जॉनी बेअरस्टो यांनी ५७ धावांची सलामी दिली. वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानने मनीष पांडेची दांडी गुल करत हैदराबादला पहिला धक्का दिला. पांडेने ३१ धावा केल्या. त्यानंतर राहुल तेवतियाने बेअरस्टोला (३०) बाद केले. दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यानंतर हैदराबादकडून झुंज पाहायला मिळाली नाही केन विल्यमसन (२०), केदार जाधव (१९), विजय शंकर (८), अब्दुल समद (१०) हे फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. राजस्थानकडून मुस्तफिजुर रहमान आणि ख्रिस मॉरिस यांनी प्रत्येकी ३ बळी घेत हैदराबादच्या डावाला सुरूंग लावला.

राजस्थानचा डाव

राजस्थानकडून जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांनी डावाची सुरुवात केली. पॉवरप्लेमध्ये राशिद खानने यशस्वीला वैयक्तिक १२ धावांवर पायचित पकडले. त्यानंतर संजू सॅमसन आणि बटलरने राजस्थानचा डाव पुढे नेला. पहिल्या ६ षटकांच्या पॉवरप्लेमध्ये राजस्थानने १ बाद ४२ धावा केल्या. सुरुवातीला संयमी खेळणारा बटलर पॉवरप्लेनंतर आक्रमक झाला. त्याने आणि सॅमसनने हैदराबादच्या गोलंदाजांवर प्रहार करण्यास सुरुवात केली. या दोघांनी दीडशे धावांची भागीदारी रचली.

अर्धशतकाकडे कूच करणाऱ्या सॅमसनला १७व्या षटकात विजय शंकरने माघारी धाडले. सीमारेषेवर अब्दुल समदने सॅमसनचा सुंदर झेल टिपला. सॅमसनने ४ चौकार आणि २ षटकारांसह ४८ धावा केल्या. याच षटकात बटलरने आपले शतक पूर्ण केले. आक्रमक खेळणाऱ्या बटलरने १९व्या षटकात संदीप शर्माला २४ धावा चोपल्या, पण षटकाच्या शेवटच्या चेंडूवर तो बाद झाला. त्याने ६४ चेंडूत ११ चौकार आणि ८ षटकारांसह १२४ धावांची खेळी केली.