कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाच्या सलामी फलंदाजीचा प्रश्न अजून सुटताना दिसत नाही. मागील सामन्यात त्यांनी पंजाबला हरवले असले, तरी कोलकाताची सलामी फलंदाजी अयशस्वी ठरली. शुबमन गिल पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. पंजाबविरुद्धच्या सामन्यात त्याला ९ धावा करता आल्या. भारताचे माजी सलामीवीर सुनील गावसकर यांनी कोलकाताच्या या प्रश्नावर एक उपाय सुचवला आहे.

गावसकरांनी केकेआर संघाला सलामी जोडी बदलण्याचा सल्ला दिला आहे. ”राहुल त्रिपाठी आणि सुनील नरिन हे फलंदाज केकेआरच्या डावाची सुरुवात करू शकतात आणि हा एक चांगला पर्याय आहे. मागील वर्षांत राणाने केकेआरसाठी चांगली कामगिरी केली होती, पण तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत होता. त्याचबरोबर राहुल त्रिपाठीने सलामीवीर म्हणून आयपीएलमध्ये आपले नाव कोरले आहे. त्यामुळे तो केकेआरसाठी डावाचा प्रारंभ करू शकतो. शुबमन गिल ज्या पद्धतीने संघर्ष करत आहेत, त्यावरून राहुल त्रिपाठी सुनील नरिनबरोबर चांगली सुरुवात करू शकतील”, असे गावसकरांनी सांगितले.

मॉर्गनबाबत गावसकर म्हणाले….

कर्णधार ईऑन मॉर्गनबाबत गावसकर म्हणाले, ”मॉर्गन आपले फटके खेळत होता, तो देखील आक्रमक होता, हा त्याचा सामान्य खेळ आहे. जेव्हा आपण संघाच्या विजयात योगदान देता आणि संघाला संतुलित ठेवता तेव्हा चांगले वाटते. जेव्हा तो फलंदाजीला आला तेव्हा केकेआरचे तीन फलंदाज बाद झाले होते. संघाला भागीदारीची आवश्यकता होती. त्याने राहुल त्रिपाठीशी चांगली भागीदारी रचली. माझ्या मते मॉर्गनने संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.”