आयपीएल स्पर्धा सध्या अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आज कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद असा पहिला एलिमनेटर सामना खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी दोन्ही संघांसाठी ‘करो या मरो’ अशी स्थिती आहे. बंगळुरूच्या स्टेडियमवर याआधी पावसाच्या आगमनामुळे सामने रद्द करण्याची नामुष्की अनेकदा ओढावली आहे. यंदाही साखळी फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देऊन सामना पावसामुळे रद्द झाल्याचे पंचांनी घोषित केले होते. पण आजच्या सामन्यात पावसाचे आगमन झाले तर कोलकाता संघाला मोठा धक्का बसणार आहे. एलिमनेटर सामना पावसामुळे रद्द झाला तर तो दुसऱ्या दिवशी नव्याने खेळवण्यात येणार नाहीय. ज्या संघाचे गुणतालिकेत जास्त गुण आहेत त्या संघाला विजेता म्हणून घोषित करण्यात येईल. सनरायझर्स हैदराबादला याचा फायदा होईल. हैदराबादच्या खात्यात कोलकातापेक्षा एक गुण जास्त आहे. पावसामुळे सामना होऊ शकला नाही तर सनरायझर्स हैदराबाद पुढच्या फेरीत दाखल होऊन मुंबई इंडियन्स विरुद्ध पुढचा सामना खेळेल.
खरंतर आयपीएलमध्ये गुणांच्या आधारावर याआधी केव्हाच संघाला विजेता म्हणून जाहीर करण्यात आलेलं नाही. याआधी २०१४ साली पहिल्या क्लॉलिफायर सामन्यात पावसाचा व्यत्यय आला होता. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब सामना रद्द करावा लागला होता. दुसऱ्या दिवशी हा सामना पुन्हा नव्याने खेळविण्यात आला होता. यंदा मात्र गुणांच्या आधारावर विजेता संघ निश्चित केला जाईल. त्यामुळे कोलकाताचा कर्णधार गौतम गंभीर आणि संघाला वरुणराजाने व्यत्यय आणू नये अशी आशा आहे.