देशांमध्ये होणाऱ्या निवडणुका पाहता यंदाची आयपीएल स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत हलवण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. निवडणूक असल्यामुळे आयपीएलच्या सामन्यांना पुरेशी सुरक्षा मिळू शकणार नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आयपीएलचे अधिकारी आणि गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची येत्या काही दिवसांमध्ये बैठक होणार असून दहा दिवसांमध्ये याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
‘‘ आमच्याकडे सध्याच्या घडीला बरेच पर्याय उपलब्ध आहेत. आम्ही याबाबत गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी बैठकीमध्ये चर्चा करणार आहोत. भारतामध्ये आयपीएलचे सामने होणे आम्हाला नक्कीच आवडेल आणि त्यालाचा आमचे नेहमीच पहिले प्राधान्य असेल. पण जर भारतामध्ये आयपीएल खेळवणे शक्य नसेल तर आमच्यापुढे दक्षिण आफ्रिकेचा दुसरा पर्याय असेल, त्याचबरोबर आमच्याकडे तिसरा आणि चौथा पर्याय खुला आहे,’’ असे आयपीएलचे अध्यक्ष रणजिब बिस्वाल यांनी सांगितले.
भारतात आयपीएल होणार नसेल तर दक्षिण आफ्रिकेचा पर्याय बिस्वाल यांनी बोलवून दाखवला असला तरी तिसऱ्या आणि चौथ्या पर्यायासाठी बांगलादेश व संयुक्त अरब अमिराती हे पर्याय त्यांच्यासाठी खुले आहेत.
बिस्वाल पुढे म्हणाले की, ‘‘आम्ही यंदाची आयपीएल ९ एप्रिल ते ३ जून या कालावधीमध्ये घेण्याचे ठरवले आहे. याबाबत आम्ही गृहमंत्रालयाशी चर्चा करणार आहोत. जास्तीत जास्त सामने आम्हाला भारतात व्हावेत, असेच वाटत आहे. जर आम्हाला गृहमंत्रालयाकडून हिरवा कंदील मिळाला तर नक्कीच आम्ही सर्व सामने भारतात खेळवू.’’
२००९ साली आयपीएल सुरक्षेच्या कारणास्तव दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आली होती, त्या वेळी ललित मोदी हे आयपीएलचे कमिशनर होते.
‘‘ गेल्या दोन दिवसांपासून संघांना विश्वासात घेऊन आम्ही या विषयावर काही चर्चा केल्या आहेत आणि आम्ही त्याला सातत्याने संपर्कात राहून पाठपुरावा करू. आयपीएलच्या प्रशासकीय समितीची बैठक येत्या काही दिवसांमध्ये आम्ही घेणार आहोत. ही समस्या आम्ही येत्या १० दिवसांमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करू,’’ असे बिस्वाल यांनी पुढे सांगितले.
आयपीएलच्या सध्याच्या लिलावाबाबत बिस्वाल म्हणाले की, ‘‘नावाजलेले आणि देशाचे प्रतिनिधित्व न केलेले खेळाडू, असा कोणताच भेदभाव आम्हाला करायचा नाही. स्थानिक स्पर्धामध्ये चांगली कामगिरी केलेल्या, पण भारताचे प्रतिनिधित्व करू न शकलेल्या खेळाडूंना चांगला भाव मिळावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो आणि तसे यंदाच्या लिलावात पाहायलाही मिळाले. देशाचे प्रतिनिधित्व न केलेल्या खेळाडूंना यंदाच्या लिलावात चांगली किंमत मिळाली, काही जण कोटय़धीशही झाली.’’