देशातील सहा शहरांमध्ये साखळी सामन्यांची योजना; हैदराबाद, चंडीगड आणि जयपूरला वगळले

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या १४व्या हंगामाचे सामने यंदा चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद, बेंगळूरु, दिल्ली आणि मुंबई या सहा शहरांमध्ये आयोजित करण्यात येणार आहेत, असे चर्चेच्या पहिल्या फेरीनंतर स्पष्ट होत आहे. यापैकी मुंबई प्रेक्षकांविना सामन्यांना परवानगी देण्यात आली आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) करोना साथीच्या पार्श्वभूमीवर यंदा स्पध्रेच्या आखणीत बदल केला आहे. चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद, बेंगळूरु आणि दिल्ली अशा पाच शहरांची निवड केली होती. परंतु महाराष्ट्र शासनाने प्रेक्षकांविना सामन्यांना शनिवारी परवानगी दिल्यामुळे या यादीत मुंबई या सहाव्या शहराची भर पडली आहे.

हैदराबाद, चंडीगड आणि जयपूरला सामने होणार नसल्यामुळे अनुक्रमे सनरायजर्स हैदराबाद, पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या संघांना घरच्या मैदानांवर खेळता येणार नाही.

‘‘यंदाच्या ‘आयपीएल’च्या तारखा आणि कार्यक्रमपत्रिका याविषयी प्रशासकीय समितीकडून आम्हाला कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. प्रसारमाध्यमांकडूनच आम्हाला हे कळते आहे. परंतु गृहमैदानावर सामने झाले नाहीत, तर सलग दुसऱ्या वर्षी स्थानिक चाहत्यांची निराशा होईल,’’ असे एका ‘आयपीएल’ संघाच्या व्यवस्थापन सदस्याने सांगितले.

दोन गटांत विभागणी

‘आयपीएल’च्या साखळीत आतापर्यंत प्रत्येक संघ दुसऱ्या संघाशी दोन सामने खेळायचा. त्यामुळे उभय संघांचे सामने दोन्ही संघांच्या गृहमैदानावर व्हायचे. परंतु यंदा प्रवास कमी करण्यासाठी आठ संघांची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक शहरात विशिष्ट सामनेच संघांना खेळता येतील.

‘आयपीएल’ला प्रारंभ ११ एप्रिलपासून?

‘आयपीएल’च्या १४व्या हंगामाला ११ एप्रिलपासून प्रारंभ होण्याची दाट शक्यता आहे. परंतु ‘बीसीसीआय’ने अद्याप कार्यक्रमपत्रिका निश्चित केलेली नाही.

कार्यक्रमपत्रिका ३० दिवस आधी?

‘आयपीएल’चे प्रक्षेपणकर्त्यां वाहिनीने ‘बीसीसीआय’कडे संपूर्ण कार्यक्रमपत्रिका किमान एक महिना आधी निश्चित करण्याची विनंती केली आहे. प्रक्षेपणाची तयारी आणि जाहिरातीच्या विक्रीसाठी पुरेसा अवधी मिळावी म्हणून ही मागणी केल्याचे प्रक्षेपणकर्त्यांकडून सांगण्यात आले.