04 March 2021

News Flash

श्रीशांत, अंकितची तिहारमधून सुटका

तब्बल २६ दिवस ‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणी पोलीस कोठडीची हवा खाणाऱ्या एस. श्रीशांत, अंकित चव्हाण आणि १४ सट्टेबाजांसह एकूण १९ आरोपींची मंगळवारी तिहार तुरुंगातून सुटका झाली.

| June 12, 2013 12:52 pm

तब्बल २६ दिवस ‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणी पोलीस कोठडीची हवा खाणाऱ्या एस. श्रीशांत, अंकित चव्हाण आणि १४ सट्टेबाजांसह एकूण  १९ आरोपींची मंगळवारी तिहार तुरुंगातून सुटका झाली. श्रीशांत आणि अंकितला दिल्ली न्यायालयाने सोमवारी जामीन दिला होता. श्रीशांत, अंकित आणि अजित चंडिला यांना दिल्ली पोलिसांनी मुंबईमधून अटक केली होती. त्यानंतर सुरुवातीला १३ दिवस श्रीशांतला पोलीस कोठडी ठोठावण्यात आली होती, तर अंकित चव्हाणला लग्नासाठी जामीन देण्यात आला होता.
सोमवारी दिल्ली न्यायालयाने ‘मोक्का’लावण्यात आलेल्या श्रीशांत, अंकित आणि अन्य १७ जणांना जामीन मंजूर केला होता. जामीन मंजूर करताना कोर्टाने सांगितले होते की, ‘‘प्रथमदृष्टय़ा पाहताना या आरोपींविरोधात पुरेसे पुरावे नाहीत. त्याचबरोबर त्यांचा संघटित गुन्हेगारीशी संबंध असल्याचे सिद्ध झालेले नाही.’’या दोन क्रिकेटपटूंबरोबर १४ सट्टेबाजांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सोडण्यात आले. पोलिसांनी एकूण २६ जणांना अटक केली होती. त्यामधील १९ जणांना जामीन मिळाला असून सहा जणांना १८ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा निर्णय कोर्टाने दिला आहे. तर रमेश व्यास या सट्टेबाजाला १८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. चंडिलाबरोबरच अन्य सहा जणांनी अजूनही जामिनासाठी अर्ज केलेला नाही.बीसीसीआयच्या चौकशी समितीचे प्रमुख रवी सवानी यांनी सोमवारी आपला अहवाल बीसीसीआयकडे सादर केला होता. त्यामुळे श्रीशांत, अंकित आणि चंडिलाला बीसीसीआयच्या चौकशीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

धोनीने कंपनीबरोबरचे संबंध तोडावेत -सावंत
नवी दिल्ली : महेंद्रसिंह धोनीकडे भारतीय संघाचे नेतृत्व असल्यामुळे  त्याने ऱ्हिती स्पोर्ट्स या क्रीडा व्यवस्थापन संस्थेबरोबरचे संबंध त्वरीत तोडावेत, असे बीसीसीआयचे नवीन कोषाध्यक्ष रवी सावंत यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘कंपनीसोबतच्या हितसंबंधाबाबत धोनीला बीसीसीआयने कारणे दाखवा नोटीस बजावली पाहिजे. चॅम्पियन्स स्पर्धा संपल्यानंतर आपण याबाबत सविस्तर चौकशी करणार असल्याचे मंडळाने यापूर्वी जाहीर केले आहे.’’

रॉकी, अमित यांना जामीन
नवी दिल्ली : स्पॉटफिक्सिंग प्रकरणी नवी दिल्लीतील न्यायालयाने सट्टेबाज राकेश तथा रॉकी व अमितकुमार सिंग यांची मंगळवारी ५० हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश विनयकुमार खन्ना यांच्यासमोर या दोन्ही सट्टेबाजांच्या जामिनाबाबत सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने दोघांचीही जामिनावर मुक्तता केली. न्यायालयाने सोमवारी अंकित चव्हाण व एस. श्रीशांत यांची जामिनावर मुक्तता केली होती. आतापर्यंत अठरा जणांना जामीन देण्यात आला आहे. अंकित व श्रीशांत यांच्यावर मोक्का कायदा लावण्याइतका सबळ पुरावा नसल्यामुळे त्यांच्यावर हा कायदा लावणे अयोग्य होईल, असा निर्णय देत न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली.

चुकीच्या व्यक्तींमुळे क्रिकेटच्या प्रतिमेला तडा गेलेला नाही -गंभीर
नवी दिल्ली : स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणामुळे क्रिकेटच्या प्रतिमेला तडा गेला आहे, असे भारताचा फलंदाज गौतम गंभीरला वाटत नाही. ‘‘काही मोजक्या चुकीच्या व्यक्तींमुळे क्रिकेटची प्रतिमा मलीन होऊ शकत नाही. क्रिकेटमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तसेच चांगली कामगिरी करण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत. चुकीचे काम करण्यापासून कुणालाही रोखता येणार नाही. अशा व्यक्तींना स्पर्धेपासून दूर ठेवलेलेच बरे. आपण चांगले काम करायचे की वाईट, हा प्रत्येकाचा निर्णय आहे. आयपीएलमधील बाहेरच्या घडामोडींचीच चर्चा अधिक होते, पण ही स्पर्धा खरोखरच खूप चांगली आहे,’’ असे गंभीरने सांगितले.

हे प्रकरण विसरण्याची माझी इच्छा नाही. या प्रकरणाने मी बऱ्याच गोष्टी शिकलो आहे. मी नेहमीच खिलाडीवृत्तीने क्रिकेट खेळत आलो आहे. या खेळासाठी मी तन-मन-धन अर्पण केले आहे. या प्रकरणातून मी सहीसलामत बाहेर पडेन, असा विश्वास आहे. देशातील न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. आयुष्यातील खडतर काळात पाठीशी उभे राहणाऱ्या प्रत्येकाचा मी आभारी आहे. तुरुंगातून सुटका झाल्यामुळे मी आनंदी झालो आहे. देवावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे सर्वप्रथम देवाचे आभार मानून  मी चाहते, कुटुंबीय, मित्रमंडळी, वकील तसेच शुभचिंतकांचा ऋणी राहीन.
– एस. श्रीशांत

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2013 12:52 pm

Web Title: ipl spot fixing sreesanth other accused released from tihar jail
Next Stories
1 ऑस्ट्रेलियासाठी अखेरची संधी
2 इंडोनेशिया सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धा : सायनाने पराभव टाळला
3 ‘स्पॉट-फिक्सिंग’नंतरचा अनुभव सर्वात खडतर -हरमीत सिंग
Just Now!
X