अवघ्या 10 वर्षांमध्ये इंडियन प्रीमियर लीगनं उत्पन्नामध्ये बाजी मारली असून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अतिरिक्त उत्पन्नात तब्बल 95 टक्के वाटा आयपीएलचा आहे. बीसीसीआयच्या अंदाजानुसार येत्या आर्थिक वर्षामध्ये आयपीएलमुळे अतिरिक्त उत्पन्न 2,017 कोटी रुपयांचे असेल. तर अन्य देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून मिळणारे उत्पन्न अवघे 125 कोटी रुपये असेल. बीसीसीआयच्या या अंदाजानुसार अवघ्या 45 दिवसांमध्ये जितका नफा आयपीएलमधून मिळतो तो उर्वरीत 320 दिवसांमध्ये अन्य सामन्यांमधून मिळणाऱ्या नफ्याच्या 16 पट जास्त आहे.
बीसीसीआयने खेळाच्या पायाभूत सुविधांवर व बाकी सगळ्या गोष्टींवर 1,272 कोटी रुपयांचा खर्च केल्यानंतर 3,413 कोटी रुपयांच्या एकूण उत्पन्नातील शिल्लक राहणारे हे उत्पन्न आहे.

टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार या आर्थिक वर्षात बीसीसीआयच्या एकूण अतिरिक्त उत्पन्नातील आयपीएलचा वाटा 60 टक्क्यांच्या आसपास असेल. परंतु पाच वर्षांसाठी वितरण हक्कांचा जो करार स्टार इंडियाबरोबर करण्यात आला आहे त्यामुळे सगळं चित्रच पालटणार आहे. हा करार 16,347 कोटी रुपयांचा असल्यामुळे आयपीएलमधून मिळणारे अतिरिक्त उत्पन्न 2017 कोटी रुपये असणार आहे. आधीच्या आर्थिक वर्षात हे उत्पन्न 400 कोटी रुपये होते. या खेरीज बीसीसीआयला आंतरराष्ट्रीय व अन्य देशी सामन्यांमधून 125 कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे. त्यामुळे आयपीएल ही बीसीसीआयसाठी दुभती गाय ठरत आहे.

बीसीसीआयचे एकूण अतिरिक्त उत्पन्न त्यामुळे 665 कोटी रुपयांवरून वधारून 2,142 कोटी रुपये होणार आहे. येत्या आर्थिक वर्षात भारत ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये प्रत्येकी 10 सामने खेळणार आहे. पण न्यूझीलंडमध्ये पहाटे 3 वाजता सामना सुरू होत असल्यामुळे जाहिरातीचे उत्पन्न बुडण्याचा धोका असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अर्थात हे वर्ल्ड कपचेही वर्ष असल्यामुळे काही प्रमाणात हे नुकसान भरून निगण्याचीही शक्यता आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात येणार आहे व नंतर झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर जाणार आहे. भारत न्यूझीलंडच्या दौऱ्यावर 2014 मध्ये गेला होता त्यावेळी 2 कसोट सामने व 5 एकदिवसीय सामने झाले होते, आता तब्बल पाच वर्षांनी भारत न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जात आहे.