स्विंगचा जादूगार इरफान पठाणने भारतीय संघातील स्थान गमावल्याची व्यथा एका मुलाखतीमध्ये मांडली. २०१२ मध्ये सातत्यपूर्ण मैदानात उतरल्यामुळे दुखापतीने ग्रासले. यातून सावरणे इतके कठीण झाले की, अखेर संघात पुनरागमन करणे शक्य झाले नाही, असे पठाणने म्हटले आहे.

‘क्रिकइन्फो’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये इरफानने कारकिर्दीतील चढ उताराच्या घटनाक्रम सांगितला. तो म्हणाला की, चॅम्पियन्स लीगस्पर्धेतील उपांत्य सामन्यानंतर मी मायदेशात इंग्लंडविरुद्ध तीन दिवसांच्या सामन्यात सहभागी झालो. तिसऱ्या आणि अखेरच्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर रणजी करंडक स्पर्धेत कर्नाटकविरुद्ध खेळण्यासाठी मैदानात उतरलो. बडोद्याकडून खेळताना या सामन्यात शतकी खेळी केली. यावेळी एका डावात तब्बल २० षटके गोलंदाजी केली. या काळात सलग नऊ दिवस क्रिकेट खेळलो. त्यामुळे गुडघ्याची दुखापत वाढली. सध्या या गोष्टी उघड करणे योग्य नाही, पण दुखापतग्रस्त होण्यापूर्वी सर्व असेच घडले होते. यावेळी मदतीची गरज होती. मात्र, मदत मिळाली नाही, असेही तो म्हणाला.

इरफान पठाण बऱ्याच वर्षांपासून भारतीय संघाबाहेर आहे. २०१२ मध्ये रंगलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने भारताकडून अखेरचा सामना खेळला होता. त्यानंतर २०१२ मध्ये त्याने चॅम्पियन्स लीग टी २० स्पर्धेत दिल्ली डेअरडेव्हिल्सचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेनंतर इंग्लंडविरुद्धच्या तीन दिवसीय सामन्यात त्याने १९ षटके टाकली. यात त्याला एकही बळी मिळवता आला नव्हता. सातत्यपूर्ण खेळामुळे दुखापतग्रस्त झालेल्या इरफानला त्यानंतर भारतीय संघात स्थान मिळवण्यात अपयश आले.