भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या भूमीत एकदिवसीय मालिकेत २-१ असे पराभूत केले. या मालिकेत भारताने फलंदाजी आणि गोलंदाजी दोनही क्षेत्रात उत्तम कामगिरी केली. पण या मालिकेनंतर पुन्हा एकदा २०१३चा तो सामना चर्चेत आला. २०१३ साली मोहाली येथे तिसरा एकदिवसीय सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु होता. त्यावेळी १८ चेंडूत ऑस्ट्रेलियाला ४४ धावांची गरज असताना इशांत शर्माने ४८व्या षटकात ३० धावा खर्च केल्या. जेम्स फॉक्नर या अष्टपैलू फलंदाजाने त्याची धुलाई केली होती आणि तो त्या सामन्याचा सामनावीरदेखील ठरला होता.

याबाबत एका मुलाखतीत बोलताना इशांत म्हणाला की त्या घटनेनंतर मला नैराश्य आलं होतं. १५ दिवस मी रडत बसलो होतो. पण त्यावेळी माझ्या प्रेयसीने (आताची पत्नी) मला सावरण्यासाठी मदत केली. मला जेव्हा नैराश्य आले होते, त्यावेळी तिने मला सांगितले की तू दोन गोष्टी करू शकतोस. एक तर तू असाच रडत बसू शकतोस किंवा नव्या उमेदीने पुन्हा तयारीला लागू शकतोस. तिच्या या सल्ल्याने मला खूप फायदा झाला आणि मी क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन करू शकलो, असेही इशांत म्हणाला.

हेच ते षटक –

याबाबत त्याची पत्नी प्रतिमा हिनेदेखील भावना व्यक्त केल्या. ‘मी इशांतला आयुष्यात इतका निराश झालेला कधीही पाहिला नव्हता. त्याचवे डोळे कायम पाणावलेले असायचे. तो रडत बसायचा.पण मला ते फावत नव्हते. मी अखेर त्याला ठणकावून सांगितले कि क्रिकेट हेच सर्वस्व नाहीये. अजून खूप आयुष्य शिल्लक आहे. क्रिकेट इतकं डोक्यावर चढवून घेऊ नकोस, असे इशांतची पत्नी प्रतिमा हिने सांगितले.