दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या फिटनेस टेस्टबद्दल गेल्या काही दिवसांबद्दल चर्चा सुरु होत्या. बंगळुरुची राष्ट्रीय क्रिकेट अकादमी बुमराहची फिटनेस टेस्ट करण्याबद्दल उत्सुक नसल्याची माहिती समोर आली होती. बुमराहनेही NCA मध्ये जाण्याऐवजी स्वतःचे खासगी डॉक्टर आणि ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली सराव करण पसंत केलं होतं. मात्र बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी या सर्व प्रकरणावर आपलं मत मांडत, बुमराहला NCA मध्ये फिटनेस टेस्ट द्यावीच लागेल असं स्पष्ट केलं आहे.

“मला या प्रकरणाबद्दल नेमकी माहिती नाहीये. मात्र भारतीय खेळाडूंना NCA मध्ये परतावच लागणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायचं असेल तर खेळाडूंनी NCA मधून फिटनेस टेस्ट देणं हा पहिला आणि शेवटचा पर्याय आहे. त्यांना योग्य त्या सुविधा उपलब्ध करुन देणं ही आमची जबाबदारी आहे”, सौरव गांगुलीने प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली. बुमराहने NCA मध्ये जाण्यास नकार दिल्यानंतर संचालक राहुल द्रविडनेही याबद्दल नाराजी व्यक्त करत बुमराहला स्वतःच्या डॉक्टर आणि ट्रेनरसोबत सरावाचा सल्ला दिला होता. यासंदर्भातही आपण राहुल द्रविडशी चर्चा करणार असल्याचं गांगुलीने स्पष्ट केलं.

जागतिक क्रमवारीत सध्या पहिल्या क्रमांकावर असलेला बुमराह, आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचे ट्रेनर शिवांगम यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत सराव करतोय. त्यामुळे आगामी काळात बुमराह फिटनेस टेस्टसाठी NCA मध्ये कधी परततोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.