पुढील वर्षी होणाऱ्या रिओ डी जानेरिओ ऑलिम्पिकचे सुवर्णपदक साध्य करण्यासाठी नेमबाजपटू जितू राय उत्सुक आहे. त्या दृष्टीने या वर्षी ऑगस्ट महिन्याच्या मध्यावर रिओमध्ये होणाऱ्या नेमबाजी स्पध्रेत तो सहभागी होणार आहे. याचप्रमाणे तो तयारी करणार आहे, अशी माहिती जितूने दिली.
‘‘ऑलिम्पिकच्या वर्षभर आधी १५-१६ ऑगस्ट या त्याच तारखांना सराववजा स्पध्रेसाठी रिओला जाणार आहे. ऑलिम्पिकच्या वातावरणाची अनुभूती या दौऱ्यामुळे मला मिळेल,’’ असे गतवर्षी राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पध्रेत ५० मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकांची किमया साधणाऱ्या जितूने सांगितले.
नेपाळमध्ये जन्मलेला आणि सेनादलात कार्यरत असलेला जितू ‘ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट’च्या सहकार्याने रिओ दौऱ्यावर जात आहे. ५ ते २१ ऑगस्ट, २०१६ या कालावधीत होणाऱ्या रिओ ऑलिम्पिकमध्ये जितूने आधीच स्थान मिळवले आहे.
निलंबित महिला बॉक्सिंगपटू सरिता देवी मनगटाला झालेल्या दुखापतीतून सावरत आहे. याबद्दल तिने ‘ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट’चे आभार मानले. गेल्या वर्षी राष्ट्रकुल स्पध्रेत ६० किला गटात तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. त्या वेळी तिला ही दुखापत झाली होती.
‘‘लीलावती हॉस्पिटलमध्ये १४ नोव्हेंबरला माझ्यावर शस्त्रक्रिया झाली. आता मी रिओ ऑलिम्पिकच्या दृष्टीने सरावाला प्रारंभ केला आहे. सुवर्णपदक जिंकून स्वत:ला सिद्ध करण्याचे माझे उद्दिष्ट आहे,’’ असे मणिपूरवासी सरिता देवीने सांगितले. गतवर्षी इन्चॉन आशियाई क्रीडा स्पध्रेत पदक वितरणाच्या कार्यक्रमात कांस्यपदक नाकारल्याबद्दल आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनने तिला एका वर्षांसाठी निलंबित केले आहे. उपांत्य फेरीच्या लढतीत सरिता वादग्रस्तरीत्या पराभूत झाली होती.
‘‘ऑलिम्पिककरिता पात्र होण्यासाठी पुढील वर्षी आशियाई अजिंक्यपद आणि जागतिक अजिंक्यपदाचे आव्हान सरितापुढे असेल,’’ असे ‘ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी विरेन रस्किन्हा यांनी सांगितले.
या उपक्रमाच्या अंतर्गत सरिता आणि जितू राय यांनी नऊ वेळा जागतिक बिलियर्ड्स विजेता गीत सेठी आणि चार वेळा विश्वविजेत्या विश्वनाथन आनंद यांचे मार्गदर्शन घेतले. रस्किन्हा म्हणाले, ‘‘या आव्हानासाठी मानसिकदृष्टय़ा सज्ज होण्याकरिता सेठी आणि आनंद यांचे त्यांना मार्गदर्शन देण्यात आले.’’