भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याता इंग्लंडच्या संघाने दुसऱ्या दिवसअखेर ८ बाद ५५५ धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार जो रूटचे दमदार द्विशतक आणि डॉम सिबली, बेन स्टोक्स यांची अर्धशतके यांच्या जोरावर इंग्लंडने धावांचा डोंगर उभारला. आजच्या दिवसातील पहिल्या दोन सत्रांवर इंग्लंडने पूर्णपणे वर्चस्व राखल्यानंतर शेवटच्या सत्रात भारतीय गोलंदाजांना काहीसं यश मिळालं. पण रूटच्या धमाकेदार खेळीमुळे इंग्लंडने पहिल्याच डावात धावांचा डोंगर उभारला.

जो रूट आणि बेन स्टोक्स यांनी दुसऱ्या दिवसाच्या खेळाची सुरूवात केली. पहिल्या सत्रात या दोघांनी ९२ धावांची भर घातली. त्यानंतर दुसऱ्या सत्रात स्टोक्सने अर्धशतक तर स्टोक्सने दीडशतक ठोकलं. बेन स्टोक्स फटकेबाजी करत असताना झेलबाद झाला. त्याने १० चौकार आणि ३ षटकार खेचले. रूटने मात्र लय कायम राखत द्विशतक झळकावले. १००व्या कसोटी सामन्यात द्विशतक ठोकणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला. रूट १९ चौकार २ षटकारांसह २१८ धावांवर बाद झाला. त्यानंतर पोप (३४), बटलर (३०) हे झटपट बाद झाले. त्यानंतर डॉम बेस (२८) आणि जॅक लीच (६) यांनी दिवसाचा खेळ संपेपर्यंत मैदानावर तळ ठोकला.

त्याआधी, नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर रॉरी बर्न्स ६० चेंडूत ३३ धावा काढून बाद झाला. त्यानंतर नवखा डॅन लॉरेन्सदेखील शून्यावर बाद झाला. त्याला बुमराहने पायचीत केले. पण त्यानंतर जो रूट आणि सिबलीने २०० धावांची भागीदारी केली. सिबली ८७ धावांवर पायचीत झाला आणि पहिल्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला.