भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचं बुधवारी मुंबईच्या जसलोक रुग्णालयात निधन झालं. वयाच्या ७७ व्या वर्षी वाडेकर यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या कर्णधारपदाच्या काळात भारतीय संघाला इंग्लंडमध्ये पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकवून देण्याच्या भीमपराक्रमाबद्दल वाडेकर यांचं नाव क्रिकेटच्या इतिहासात ओळखलं जातं. त्यांच्या निधनानंतर भारतीय क्रिकेटला वेगळी ओळख निर्माण करुन देणारा खेळाडू हरपल्याची भावना सर्वच स्तरातून व्यक्त केली जात आहे. भारताचे माजी दिवंगत क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई यांचा वाडेकरांशी चांगला दोस्ताना होता. सरदेसाईंचे पुत्र, पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी या दोन्ही खेळाडूंमधल्या एक लक्षात राहण्यासारख्या प्रसंगाची आठवण यावेळी करुन दिली.

अवश्य वाचा – भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे निधन

पहिले दोन कसोटी सामने अनिर्णित राखल्यानंतर, ओव्हलच्या मैदानात खेळवण्यात येणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला विजयाची संधी होती. दुसऱ्या डावात अजित वाडेकर आणि दिलीप सरदेसाई हे फलंदाजी करत होते. मात्र एक धाव घेताना दोघांमध्ये उडालेल्या गोंधळामुळे अजित वाडेकर धावबाद होऊन माघारी परतले. ही नेमकी कोणाची चूक होती असं राजदीप यांनी विचारलं असता वाडेकर म्हणाले, ” जर तू मला विचारशील तर धाव घेण्याचा निर्णय दिलीपचा होता. पण याबद्दल तु तुझ्या वडिलांना विचारशील तर ते असंच म्हणतील की ती धाव सहज पूर्ण करता आली असती.” पतौडी यांच्यानंतर वाडेकर यांनी माझ्या वडिलांना आग्रहाने वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी सहभागी करुन घेतलं होतं. राजदीप यांनी दोन खेळाडूंमधल्या आठवणींना उजाळा दिला.

अवश्य वाचा – वाडेकरांचा धाडसी निर्णय आणि भारताचा इंग्लंडमधील पहिला मालिका विजय

ओव्हल कसोटीत दुसऱ्या डावात माघारी परतल्यानंतर वाडेकर ड्रेसिंग रुममध्ये येऊन झोपले होते असाही किस्सा अनेकांना माहिती असेल. राजदीप यांच्याशी झालेल्या चर्चेत वाडेकर यांनी याप्रसंगाबद्दलचा खुलासा दिला होता. “हो, मी झोपण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यानंतर आम्ही सामना जिंकणार होतो, त्यामुळे अतिउत्साहात काही विपरीत घडायला नको यासाठी मी डोळे मिटून शांत पडून राहिलो होतो.” क्रिकेटसोबत अजित वाडेकर उत्तम स्वयंपाकही करायचे. “वाडेकरांनी बनवलेली कोळंबीची कढी आणि सोबत बिअर माझ्या वडिलांना प्रचंड आवडायचं. वाडेकरही आमच्या घरी मासे खाण्यासाठी यायचे. मात्र आज वाडेकरांच्या जाण्यामुळे ओव्हल कसोटीत ‘ती’ रनआऊटची विकेट कोणाच्या चुकीमुळे गेली ही चर्चा आता कायमची थांबेल.” अशा शब्दांमध्ये राजदीप सरदेसाई यांनी वाडेकर यांच्याबद्दलच्या आठवणी जागवल्या.

अवश्य वाचा – शालीन आणि शिस्तप्रिय कर्णधार