आठवडय़ाची मुलाखत – प्रशांत भाबड, महाराष्ट्राच्या कुमार कबड्डी संघाचे प्रशिक्षक

प्रशांत केणी, लोकसत्ता

मुंबई : करोना साथीच्या पाश्र्वभूमीवर खेळाडूंना कुमार राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी मानसिक आणि तंदुरुस्तीच्या दृष्टीने सज्ज करण्याचे महत्त्वाचे आव्हान आमच्यापुढे होते. त्यानुसार स्पर्धापूर्व शिबीर यशस्वी पार पडले असून, हा संघ मातब्बरांना धक्के देत जेतेपद मिळवू शकेल, असा विश्वास महाराष्ट्राच्या कुमार संघाचे प्रशिक्षक प्रशांत भाबड यांनी व्यक्त केला.

सूर्यपेठ (तेलंगणा) येथे सोमवारपासून कुमार-कुमारी राष्ट्रीय स्पर्धेला प्रारंभ होत असून, या स्पर्धेतील आव्हानांबाबत भाबड यांच्याशी केलेली खास बातचीत-

* करोनाच्या साथीचा कोणता परिणाम या वयोगटातील खेळाडूंवर दिसून आला?

गेले वर्षभर करोनाची साथ आणि टाळेबंदी यामुळे मुलांचा सराव कमी झाला आहे. शालेय-महाविद्यालयीन स्तरावरील स्पर्धा किंवा वजनी गटांच्या स्पर्धाही वर्षभरात न झाल्यामुळे सामन्यांचा सराव खेळाडूंचा झालेला नाही. पण विशेष शिबिरात या सर्व मुद्दय़ांकडे आम्ही गांभीर्याने लक्ष पुरवले.

* स्पर्धापूर्व सरावात कोणत्या बाबींवर प्रमुख भर देण्यात आला?

नाशिकला झालेल्या स्पर्धापूर्व सरावात खेळाडूंची तंदुरुस्ती, संघरचना आणि कौशल्य या त्रिसूत्रीवर भर देण्यात आला. त्यानुसार विविध सत्रांची आखणी करण्यात आली. दररोजच्या खेळानंतर त्याचे आत्मपरीक्षण आणि चर्चा हासुद्धा भाग माझ्या दृष्टीने महत्त्वाचा होता. त्यानुसार खेळात आणि मानसिकतेत आम्ही सुधारणा केल्या. आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक शैलजा जैन यांचेही मार्गदर्शन मुलांना लाभले. याचप्रमाणे वंदना कोरडे मुलांना तंदुरुस्तीविषयक सराव घ्यायच्या.

* करोनाची साथ चालू असताना ही स्पर्धा होते आहे. त्याचे कितपत दडपण मुलांवर जाणवले?

करोनाची दहशत खेळाडू आणि त्यांच्या पालकांवर असणे स्वाभाविक होते. त्यामुळे स्पर्धापूर्व शिबिरासाठी नाशिकला आल्यानंतर त्यांचे समुपदेशन हा पहिला महत्त्वाचा भाग होता. याशिवाय सांघिक संघभावना दृढ करण्याचे कार्य महत्त्वाचे होते. कारण हा एका जिल्ह्यचा संघ नाही, तर राज्याचा आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांच्या विविधतेतून एकता साधणे महत्त्वाचे होते.

* महाराष्ट्राच्या संघबांधणीबाबत काय सांगाल?

कर्णधार तेजस पाटील आणि रोहित बिन्नीवाले हे मागील वर्षीसुद्धा महाराष्ट्राच्या संघात होते. त्यांचा अनुभव उपयुक्त ठरेल. आक्रमण आणि बचाव या दोन्ही पातळ्यांवर महाराष्ट्राचा संघ सक्षम आहे. आकाश रुडले, शुभम पाटील, शुभम पठारे, शुभम दीडवाघ यांच्यासारखे अनेक गुणी खेळाडू संघात आहेत.

* कोणत्या संघांचे प्रमुख आव्हान महाराष्ट्रापुढे असेल?

भारतीय क्रीडा प्राधिकरण (साइ), हरयाणा, उत्तर प्रदेश या संघांचे प्रमुख आव्हान महाराष्ट्रापुढे असेल, पण हरयाणाच्या काही खेळाडूंचा गोवा संघातही भरणा असेल, त्यामुळे त्यांनाही कमी लेखून चालणार नाही.