राष्ट्रीय पातळीवरून राज्यस्तरावर आणलेली, परंतु राज्याच्या क्रीडा क्षेत्रात सर्वाधिक रोख बक्षिसांची लयलूट करणाऱ्या स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेला शुक्रवारपासून अहमदनगरमधील वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुलात सुरुवात होत आहे.
राज्य कुस्तिगीर परिषद व जिल्हा तालीम संघ यांच्या विद्यमाने होणाऱ्या या स्पर्धेचा समारोप १३ जानेवारीला होईल. आहे. यंदा प्रथमच ही स्पर्धा नगरला होत आहे. सरकारने यंदापासून स्पर्धेसाठी ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे व त्यातील सुमारे २९ लाख रुपयांची रोख बक्षिसे आहेत. सरकारच्या इतर कोणत्याही स्पर्धेतील बक्षिसांपेक्षा ही रक्कम अधिक आहे.स्पर्धेसाठी गोंदिया येथील राज्य अजिंक्यपद स्पर्धेतून कोल्हापूर शहर व ग्रामीण, पुणे शहर व ग्रामीण, लातूर, सांगली, नाशिक, धुळे, जळगाव हे ९ संघ पात्र ठरले. स्पर्धा पुरुषांच्या ग्रीको रोमन, फ्री स्टाइल व महिलांच्या ग्रीको रोमन प्रकारात व वजन गटानुसार होईल. एकूण २७० खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत आहेत. त्यात काही आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय कुस्तीपटू सहभागी असतील. राज्य कुस्तिगीर परिषद व जिल्हा तालीम संघ यांचा आयोजनात सहभाग आहे.