News Flash

खो-खो मैदानावरचा आणि आयुष्याचा

चंदू चावरेचा अतिशय दुर्गम भागात राहणाऱ्या या गुणी खेळाडूविषयी-

अलीकडेच नाशिक येथे झालेल्या राष्ट्रीय खो खो उपकनिष्ठ स्पर्धेत महाराष्ट्राला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा आहे, चंदू चावरेचा. अतिशय दुर्गम भागात राहणाऱ्या या गुणी खेळाडूविषयी-

खोबाळा दिगर. एका नजरेत मोजून होतील अशा घरांचे छोटेसे गांव. सह्यद्रीच्या पर्वत रांगांच्या खोबदाडय़ातील गांव म्हणून त्याचे नाव खोबाळा. कोकणमधील कोणत्याही खेडय़ाची आठवण करून देणारे निसर्गसौंदर्य. शहरी सुविधांपासून किती तरी दूर असलेल्या या पाडय़ाने केवळ नाशिकलाच नव्हे, तर देशाला असेच एक खो-खोमधील सौंदर्य चंदू सखाराम चावरे याच्या रूपात दिले आहे. डोंगर-दऱ्यांमधील रानवारा अंगी भिनलेल्या चंदूची खो-खोमधील चपळता आणि प्रतिस्पध्र्याला घेरणारी नजर शहरी भागातील खेळाडूंसाठी एक आश्चर्यच. हे नवल केवळ खेळाडूंनाच नव्हे, तर खो-खोचे जाणकार व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाही. त्यामुळे अलीकडेच नाशिक येथे झालेल्या राष्ट्रीय उपकनिष्ठ स्पर्धेत महाराष्ट्राला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या चंदूच्या खेळाने शरद पवारही थबकले. अंतिम सामना संपेपर्यंत जागचे तर हलले नाहीच, शिवाय सामना संपल्यानंतर चंदूच्या कामगिरीचा गौरव केला. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून कौतुक झालेल्या चंदूची यापुढेही खो-खो खेळण्याची इच्छा आहे.

नाशिक जिल्ह्यतील सुरगाणा या आदिवासी दुर्गम तालुक्यात चंदूचे खोबाळा दिगर हे गांव. ज्या ठिकाणच्या रस्त्यांना अद्यापही राज्य परिवहनच्या चाकांचा स्पर्श झालेला नाही. शासकीय असो वा खासगी कोणत्याही दूरसंचार कंपनीचे जाळे नाही. अशा खोबाळ्यात चंदूचे आई-वडील, दोन भाऊ, दोन बहिणी राहतात. कुडाच्या भिंती आणि खैराच्या लाकडाचा घरासाठी वापर केलेला. घर म्हणजे काय, तर आतमध्ये कोणतीही भिंत नसलेली जागा. याच जागेत चूल, अंथरूण, उखळ आणि गोठाही.

चंदू एकदा का खोबाळ्याला आला की पुन्हा नाशिकला येण्यासाठी त्याला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. खोबाळ्यापासून सुमारे १८ किलोमीटरवर त्यांच्या भागातील मोठे गाव म्हणजे बाऱ्हे. नाशिक ते बाऱ्हे अंतर सुमारे ६५ किलोमीटर. गावी बस येत नसल्याने एखाद्या खासगी जीपने चंदूला १८ किलोमीटर प्रवास करून बाऱ्हे गाठावे लागते. बाऱ्ह्यपासून बसने नाशिकला यावे लागते. म्हणजेच त्याला एका बाजूने किमान २०० रुपये तरी प्रवास भाडे लागते. शहरी माणसांच्या एकवेळच्या हॉटेलमधील जेवणाचे बिल यापेक्षा किती तरी अधिक. त्यामुळे त्यांच्यासाठी २०० रुपयांचे मोल ते काय! या २०० रुपयांची किंमत खोबाळ्यासारख्या ठिकाणी राहिल्यावर किती तरी अधिक असल्याचे लक्षात येते. खोबाळ्यापासून चंदू शिकत असलेली अलंगुणची आश्रमशाळा सुमारे ७५ किलोमीटरवर आहे. चंदू जर खोबाळ्याला असेल, तर जिल्हा खो-खो संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना त्याच्याशी संपर्क साधण्यासाठी अक्षरश: खो-खो खेळावे लागते. चंदूची वेगळीच स्थिती. त्याला पदाधिकाऱ्यांपर्यंत एखादा निरोप द्यावयाचा असेल, तर गाव भ्रमणध्वनीच्या संपर्क कक्षेत येत नसल्याने थेट जवळच्या डोंगरावर चढाई करावी लागते. त्यानंतरच भ्रमणध्वनीचा संपर्क होऊ शकतो.

खो-खो नसानसांत भिनलेल्या चंदूला भविष्याची अधिक चिंता आहे. खो-खोपासून आपण दुरावणार तर नाही ना, अशी भीती त्याला वाटत आहे. अर्थात त्याला कारणही तसेच आहे. खो-खो च्या मैदानावर आक्रमण आणि संरक्षण या दोन्ही बाजू समर्थपणे सांभाळणाऱ्या चंदूपुढे कमकुवत आर्थिक परिस्थितीच्या आक्रमणापासून आपल्यातील खो-खोपटूचे कसे संरक्षण करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. चावरे कुटुंबाची सात एकर शेती. त्यातून भात, तूर, उडीद, कुळीद, नाचणी, बाजरी अशी पिके घेतली जातात. शेती बऱ्यापैकी असली तरी शेतीतून पिकेलच, याची हमी नसल्याने आर्थिक परिस्थितीचे संकट कायम कुटुंबाभोवती घोंघावत असते.

सध्या सुरगाणा तालुक्यातीलच अलंगुण येथील अनुदानित माध्यमिक आश्रमशाळेत इयत्ता आठवीत शिकत असलेल्या चंदूने खूप शिकावे ही त्याच्या आई-वडिलांची इच्छा. त्याचा मोठा भाऊ सुरेश पाचवीपर्यंत शिकल्यावर घरकाम आणि शेतीकामासाठी त्याला पुढील शिक्षण बंद करावे लागले. ती वेळ चंदूवर येऊ नये म्हणून त्याचे आई-वडील काळजी घेत आहेत. चंदू कोणत्या स्पर्धेत खेळतो, त्याचे कोण कौतुक करतो याविषयी त्यांना काहीही घेणे नाही. चंदू चांगला खेळतो म्हटल्यावर त्याचे कौतुक होणारच, असे त्याचे वडील सखाराम चावरे यांचे रोखठोक म्हणणे, परंतु खो-खो खेळून जर चंदूला पैसा मिळणार असेल, तर त्याने खेळत राहावे अन्यथा शिक्षणाकडेच लक्ष द्यावे, अशी त्यांची भूमिका आहे. चंदू राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचला तरी त्याच्या आई-वडिलांनी अजून एकदाही त्याचा सामना पाहिलेला नाही. सामान्य ज्ञानापासून दूर असलेल्या त्याच्या आई-वडिलांना मुलाचा शरद पवार यांनी सत्कार केल्याचे छायाचित्र पाहूनही कोणतेच आश्चर्य वाटले नाही. मुळात शरद पवार असो, किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत, यांचे नाव त्यांच्या गावीही नाही.

खोबाळ्यापासून जवळच असलेल्या खिर्डी येथे चौथीपर्यंत शिक्षण घेतल्यावर पाचवीसाठी चंदूने अलंगुण आश्रमशाळेत प्रवेश घेतला. खो-खोचा श्रीगणेशा त्याने खिर्डी येथेच तिसरीपासून केला होता. माळवाल हे शिक्षक त्याचे पहिले गुरू. अलंगुणचे महेश पवार, लांडगे, महेंद्र गावित, हेमंत वाघेरे, टी. आर. गावित, बी. के. जाधव यांच्या मार्गदर्शनाने त्याच्यातील खो-खोपटू घडत गेला. सध्या आठवीत असलेला चंदू दररोज सकाळी साडेसहा ते साडेसात आणि सायंकाळी साडेपाच ते साडेसहा याप्रमाणे दोन तास सराव करतो. प्रारंभी आक्रमण आणि बचाव या दोघांमध्ये काहीशा कमकुवत असलेल्या चंदूला प्रवीण बागूल आणि विजय वाघेरे या खो-खोची आवड असलेल्या शिक्षकांकडून योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे या दोनही क्षेत्रात तो चांगलाच तरबेज झाला आहे. आश्रमशाळेतीलच गणेश राठोड या ज्येष्ठ विद्यार्थ्यांकडूनही त्यास मार्गदर्शन मिळाले. स्थानिक शिक्षकांव्यतिरिक्त जिल्हा संघटनेचे सरचिटणीस मंदार देशमुख, उमेश आटवणे तसेच इतरांकडून मिळणाऱ्या सहकार्यामुळेच शरद पवार यांच्यासारख्या दर्दी खो-खोप्रेमींपर्यंत आपले नाव पोहोचू शकले याची जाणीव चंदूला आहे.

मागील वर्षीही जूनच्या पूर्वार्धात भुवनेश्वर येथे झालेल्या १४ वर्षांआतील २७ व्या उपकनिष्ठ राष्ट्रीय खो-खो स्पर्धेचे विजेतेपद मिळविणाऱ्या महाराष्ट्राच्या संघाचा चंदू हा कर्णधार होता. कोणत्याही खेळात इतक्या लहान वयात महाराष्ट्राचे कर्णधारपद भूषविण्यास मिळणे हीच मोठी गौरवशाली बाब. शहरी भागाशी अजिबात संबंध नसलेल्या मुलाने भाषिक अडचणीवर मात करीत हे पद यशस्वीपणे सांभाळणे हे त्यापेक्षाही अधिक महत्त्वपूर्ण. सलग तीन उपकनिष्ठ राष्ट्रीय खो-खो स्पर्धेमध्ये खेळणारा चंदू हा पहिलाच खेळाडू आहे. भुवनेश्वरच्या कामगिरीची पुनरावृत्ती चंदूने नाशिकच्या स्पर्धेत केली. चंदूच्या कामगिरीची दखल शरद पवार यांच्यासारख्या राष्ट्रीय पातळीवरील नेत्याने घेतली असताना चंदूच्या जिल्ह्य़ाने तर दूरच, परंतु त्याच्या तालुक्यातील नेत्यांनीही घेतलेली नाही. यांसारखे दुर्दैव ते काय?
अविनाश पाटील – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2017 1:02 am

Web Title: kho kho player chandu chavre
Next Stories
1 धोनी तर नेहमीच जिंकतो; आज भुवनेश्वरनं जिंकलं!
2 विश्वचषकानंतर महिला क्रिकेटला ‘अच्छे दिन’- स्मृती मंधाना
3 Ind vs SL 2nd ODI : मधल्या फळीनं मारलं, धोनी-भूवीनं तारलं; दुसऱ्या वनडेत भारताचा संघर्षमय विजय
Just Now!
X