नेहमीच आपल्या थेट आणि स्पष्ट भूमिकेमुळे चर्चेत आणि प्रसंगी टीकेच्या केंद्रस्थानी असणारे भारताचे माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनी सोमवारी झालेल्या RR विरुद्ध PBKS सामन्यानंतर एक ट्वीट केलं आहे. यामुळे राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स अशा दोन्ही संघाच्या चाहत्यांची काहीशी नाराजी आकाश चोप्रा यांनी ओढवून घेतली आहे. सोमवारी अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतदार ठरलेल्या या सामन्यामध्ये पंजाबनं रॉयल्सचा अवघ्या ४ धावांनी पराभव केला. या सामन्यामध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून सर्वाधित ११९ धावा करणारा आणि पहिल्यांदाच कर्णधारपद भूषवणारा संजू सॅमसन हा या सामन्याचा मानकरी ठरला. मात्र, सामना संपल्यानंतर आकाश चोप्रा यांनी सामन्याबाबत ट्वीट करून दोन्ही संघांच्या कर्णधाराना दंड व्हायला हवा, असं म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं झालं काय?

यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्याच सामन्यात धोनीच्या CSK चा दिल्ली कॅपिटल्सनं पराभव केला. या सामन्यामध्ये षटकांचा अपेक्षित वेग न राखू शकल्यामुळे धोनीला तब्बल १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता. आता राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज या सामन्यात दोन्ही संघांनी षटकांचा वेग अत्यंत संथ ठेवल्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. नेमकं यावरच आकाश चोप्रा यांनी बोट ठेवलं आहे.

IPL 2021: राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनचा झंझावात; पराभवामुळे शतकी खेळी मात्र व्यर्थ

काय म्हणाले आहेत आकाश चोप्रा?

आपल्या ट्वीटमध्ये आकाश चोप्रा म्हणतात, “१० ओव्ह प्रतितास. दोन्ही बाजूंनी. या सामन्यात अनेक षटकार ठोकले गेले हे मान्य आहे. खूप चुरशीचा सामना झाला. पण टी २० सामन्याची एक इनिंग संपवण्यासाठी २ तास हे अजिबात मान्य होऊ शकत नाही. MSD ला याआधीच्या सामन्यामध्ये दंड ठोठावला होता. आता या दोन्ही संघांच्या कर्णधारांना देखील दंड ठोठावला जाणं अपेक्षित आहे”.

RR vs PBKS या सामन्यामध्ये टाकण्यात आलेल्या ४० षटकांमध्ये तासाला १० षटकं असा सरासरी वेग राहिला. त्यामुळे सामना देखील बराच लांबला. या सामन्यामध्ये एकूण ४४० धावा फटकावल्या गेल्या. आधी फलंदाजी करत पंजाब किंग्जनं २२१ धावा केल्या. त्याच्या उत्तरादाखल राजस्थान रॉयल्सनं कर्णधार संजू सॅमसनच्या तडाखेबाज शतकाच्या जोरावर २१८ धावांपर्यंत मजल मारता आली. ४ धावांनी हा सामना पंजाबनं जिंकला.

“CSK प्लेऑफआधीच बाहेर पडल्यास आश्चर्य वाटणार नाही”, भारताच्या माजी क्रिकेटपटूचं भाकित!

CSK बद्दल आकाश चोप्रांचं भाकित

आयपीएल सुरू होण्याआधी देखील आकाश चोप्रा यांनी माहीच्या धोनी ब्रिगेडबद्दल भाकित केलं होतं. “जलद गोलंदाजीचा विचार करता चेन्नईकडे शार्दूल ठाकूर, दीपक चहर, सॅम करन आणि ड्वेन ब्राव्हो आहेत. जोस हेझलवून हा एकमेव खराखुरा जलदगती गोलंदाज चेन्नईकडे आहे. शिवाय, चेन्नईकडे वेगाने धावा करणारी फलंदाजीही नाही. त्यामुळे १८० धावा करणंही चेन्नईला कठीण जाईल”, असं भाकित आकाश चोप्रा यांनी वर्तवलं होतं.

मराठीतील सर्व आयपीएल २०२१ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kl rahul in ipl 2021 sanju samson expected to be fined for slow overs like msd pmw
First published on: 13-04-2021 at 17:57 IST