भारताचा दमदार फलंदाज लोकेश राहुल हा धोनीच्या निवृत्तीनंतर त्याच्या वारसदारांच्या शर्यतीत आघाडीवर आहे. तडाखेबाज फलंदाजी आणि चपळ यष्टीरक्षण अशा दोन्ही गोष्टी करण्यास सक्षम असल्याचे त्याने करोनाआधी झालेल्या काही सामन्यांमध्ये दाखवून दिले आहे. सलामीवीर, तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज किंवा अगदी पाचव्या-सहाव्या क्रमांकाचा फलंदाज अशा सर्व ठिकाणी त्याने स्वत:ला सिद्ध करून दाखवले आहे. त्यामुळे त्याला कोणत्याही क्रमांकावर खेळायला पाठवले तरी तो चांगली कामगिरी करेल असा विश्वास चाहत्यांना आहे, पण राहुलला कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करणं पसंत आहे याचं त्याने उत्तर दिलं आहे.

“माझ्या क्रिकेट कारकिर्दीत मी बऱ्याच वर्षे सलामीवीर म्हणून खेळलो आहे. त्याच क्रमांकावर खेळणं मला जास्त सोयीचं वाटतं आणि आवडतं. विशेषत: टी-२० सामन्यात सलामीला उतरल्यास मला पूर्ण २० षटके खेळण्याची संधी मिळते. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाला मी माझ्या फलंदाजीचा दणका देऊ शकतो. IPLमध्ये पंजाब संघासोबत मी गेली दोन वर्षे खेळतो आहे. या दोन वर्षात मी खेळाचा खूप आनंद घेतला आहे. यंदा माझ्यावर नेतृत्वाची जबाबदारी असल्याने मी संघाला जास्तीत जास्त विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे”, असे IPLच्या वेबसाईचसाठी चित्रित करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये राहुल म्हणाला.

लोकेश राहुल यावर्षी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे नेतृत्व करताना दिसेल. लोकेश राहुल प्रथमच IPL संघाचं कर्णधारपद भूषवणार आहे. गेल्या वर्षीच्या संघाचे नेतृत्व आर अश्विनकडे होते. पण त्याला संघाला बाद फेरीपर्यंत पोहोचवता आलं नाही. त्यानंतर त्याला संघातून बाहेर करण्यात आले. आता नव्या दमाच्या पंजाब संघाचे नेतृत्व लोकेश राहुल करणार आहे.